गणपतीच्या मंडपात बारबालांसोबत ‘त्या’ रंगेल अधिकाऱ्यांचा ‘अश्लील’ डान्स !

नंदुरबार : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात गणेशोत्सव सुरु असून शासकीय कार्यालयात देखील गणपतीची स्थापना करण्यात आली आहे. मंडळांच्या गणपती समोर आकर्षक देखावे सादर केले जात आहे. मात्र, नंदुरबारमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गणपतीच्या जागरणामध्ये अश्लिल गाण्यांवर बारबालांना नाचवण्यात आले. एवढेच नाही तर या बारबलांबरोबर रेल्वेचे काही अधिकारी अश्लिल गाण्यावर थिरकले. रेल्वे अधिकारी बारबालांसमोर थिरकतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

नंदुरबारच्या रेल्वे स्टेशन परिसरात लोको पायलट्सनी गणपतीची स्थापना केली आहे. शुक्रवारी (दि. 6) रात्री गणेश मंडळातर्फे ऑर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले होते. गाणी सुरु झाल्यानंतर अचानक अश्लिल गाणे सुरु झाले. त्यावर बारबाला त्यावर डान्स करू लागल्या. यावेळी बारबालांना प्रतिसाद देताना काही कर्मचारी त्यांच्यासोबत थिरकत होते. विशेष म्हणजे या कार्यक्रमात लोको पायलट विभागाचे अधिकारी देखील उपस्थित होते. मात्र, यावेळी कोणत्याही अधिकाऱ्याने यावर आक्षेप घेतला नाही.

हा गोंधळ लोहमार्ग पोलीस आणि रेल्वे सुरक्षा बलाच्या स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर चालू होता. पोलिसांनी देखील याबाबत कोणतीही कारवाई केली नाही. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सगळीकडून टीका होत आहे. दरम्यान याबाबत रेल्वे प्रशासनाचे अधिकारी तसेच रेल्वे सुरक्षा बलाचे अधिकाऱ्यांनी यावर न बोलता त्यावर पडदा टाकण्याचे काम केल्याची चर्चा सुरु झाली आहे.