रेल्वेच्या गॅंगमन, ट्रॅकमन आणि सफाई कर्मचाऱ्यांना थायलंड वारीचं अनोखं गिफ्ट 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – पश्चिम रेल्वेने आपल्या कर्मचाऱ्यांना अनोखी भेट दिली आहे. रेल्वेच्या ५२ चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना थायलंडमध्ये पर्यटनाकरिता पाठवण्यात आले आहे. यात गॅंगमन, ट्रॅकमन आणि सफाई कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. हे पथक शनिवारी रवाना झालं असून, पाच दिवसांनंतर ते मायदेशात परतणार आहेत.

मुंबईची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या लोकलच्या देखभाल, दुरुस्तीचं काम चतुर्थ श्रेणीचे कर्मचारी करत असतात. अत्यंत कठीण परिस्थितींमध्येही ते कार्यरत असतात. विदेशातील सहल करण्यासाठी सर्वच जण उत्सुक असतात. मात्र, अहोरात्र काम करणाऱ्या चतुर्थ श्रेणीच्या कर्मचाऱ्यांना विदेश वारी घडवून रेल्वेनं कौतुकास्पद पाऊल उचललं आहे.

पश्चिम रेल्वेनं थॉमस अँण्ड कूक या यात्रा कंपनीसह करार केला आहे. यानुसार चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना सवलतीच्या दरात विदेशी सहल उपलब्ध करून देण्यात आली. या सहलीच्या एकूण खर्चापैकी केवळ ३३ टक्के रक्कम कर्मचाऱ्यांकडून घेण्यात आली. रेल्वेनं टी-शर्ट, टोप्या आणि ट्रॉली बॅग देऊन या कर्मचाऱ्यांना रवाना केलं. कर्मचारी कल्याण निधीतून या सहलीचं आयोजन करण्यात आलं. पश्चिम रेल्वेच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी सहल आखण्यात आली, असं पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी सांगितलं.

रेल्वेकडून अशा प्रकारच्या परकीय सहलीसाठी आम्हांला पाठवण्यात येईल, असं कधीच वाटलं नव्हतं. ही सहल आमच्यासाठी विशेष असणार असल्याच्या भावना कर्मचाऱ्यांनी व्यक्त केल्या, अशी माहिती पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक ए. के. गुप्ता यांनी दिली. ५२ जणांच्या या पथकात २० महिला, २८ पुरुष कर्मचारी आणि ४ टूर कॉर्डिनेटर सहभागी झाले आहेत.