रेल्वेमंत्री पीयूष गोयल रुग्णालयात दाखल होणार, म्हणाले – ‘लवकरच परत येईन !’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्यावर मुतखड्याची म्हणजेच किडनी स्टोनची शस्त्रक्रिया केली जाणार आहे. पीयूष गोयल यांनी स्वत: ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. लवकरच आपण रुग्णालयातून परत येऊ असं ते म्हणाले आहेत. केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या निधनानंतर गोयल यांच्याकडे ग्राहक संरक्षण, खाद्य आणि सार्वजनिक वितरण खात्याचा अतिरीक्त भार देण्यात आला आहे.

पीयूष गोयल यांनी शुक्रवारी ट्विट केलं आहे. आपल्या ट्विटमध्ये गोयल म्हणतात, “मला मुतखडा काढण्यासाठी एका प्रक्रियेतून जावं लागणार आहे. लवकरच परत येईन” असंही त्यांनी सांगितलं आहे.

यापूर्वीही झाले होते रुग्णालयात दाखल
पीयूष गोयल हे यापूर्वी देखील रुग्णालयात दाखल झाले होते. 3 वर्षांपूर्वी म्हणजेच 2017 मध्ये त्यांना पोटाचं दुखणं सुरू झालं होतं. त्यानंतर ते रुग्णालयात दाखल झाले होते. त्यावेळी त्यांच्या मुत्रपिंडात मुतखडा असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं होतं. मात्र त्यावेळी शस्त्रक्रिया न करता औषधोपचार करून तो काढण्यात आला होता.