माता न तू वैरिणी ! जन्मदात्या आईने ३ महिन्याच्या चिमुरड्याला दिले रेल्वेत टाकून

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मुंबईहून वाराणशीकडे जाणाऱ्या काशी एक्सप्रेसमध्ये अज्ञात महिलेने आपल्या बाळाला बेवारस सोडून दिल्याची घटना उघडकीस आली आहे. बेवारस स्थितीत आढळलेल्या या बाळाला भुसावळ रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले. बाळाला बेवारस सोडून देणाऱ्या महिलेचा शोध न लागल्याने अखेर रेल्वे पोलिसांनी जळगाव येथील बालसुधारगृहात त्याची रवानगी केली.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनसहून निघणाऱ्या काशी एक्सप्रेस मध्ये एका महिलेने आपल्या अडीच ते तीन महिन्याच्या बाळाला बेवारस सोडून दिले. स्लीपर कोचमध्ये हे बाळ बेवारस स्थितीत प्रवाशांना आढळून आले. प्रवाशांनी भुसावळ रेल्वे स्थानकावर पोलिसांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी त्या बाळाला आपल्या ताब्यात घेतले व त्या बाळाच्या आईचा शोध घेतला. मात्र बाळाला सोडून जाणाऱ्या त्या महिलेचा शोध लागला नाही. शेवटी पोलिसांनी या बाळाला जळगाव येथील बालसुधारगृहात पाठवले.