पारसिक बोगद्याजवळ रुळाला ‘तडे’, मुंबईकडे जाणारी वाहतूक ‘खोळंबली’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कल्याणकडून येणाऱ्या  जलद मार्गावरील पारसिक बोगद्याजवळ रेल्वे रुळाला तडे गेल्याचे आज सकाळी आढळून आले. त्यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या वाटेत खोळंबून राहिल्या आहेत. वाटेत अनेक ठिकाणी या गाड्या थांबवून ठेवण्यात आल्या असून काही गाड्या स्लो मार्गावर वळविण्यात आल्या आहेत.

कल्याण हून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावरील जलद मार्गावर पारसिक बोगदा येतो. जलद गाड्या या बोगद्यातून जातात तर, अन्य स्लो गाड्या या डोंगराला वळसा घालून जातात.बोगद्याजवळ रुळाला तडे गेल्याचे लक्षात आल्याने मार्गावरील वाहतूक थांबविण्यात आली आहे. काही जलद गाड्या स्लो मार्गावरुन वळविण्यात आल्या आहेत.

आज चौथा शनिवार असल्याने सरकारी कार्यालयांना सुट्टी आहे. त्यात दिवाळीच्या सुट्ट्या सुरु झाल्याने लोकलला गर्दी कमी आहे.रुळाची दुरुस्ती करण्याचे काम सुरु असून काही वेळातच ही दुरुस्ती पूर्ण होऊन जलद मार्ग पुन्हा सुरु होण्याची शक्यता आहे.