खुशखबर ! रेल्वेच्या ‘हमसफर’ गाड्यांची ‘फ्लेक्सी फेयर’ योजना बंद, तात्काळ तिकीट झालं स्वस्त, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी एक खुशखबर असून प्रसिद्ध ‘हमसफर’ गाडीचा प्रवास आता स्वस्त होणार आहे. प्रवाशांना मोठा दिलासा देताना रेल्वेने त्यांच्या प्रीमियम हमसफर गाडीच्या स्लीपर कोचमधून फ्लेक्सी फेअर योजना काढून टाकली आहे. याचबरोबर या गाड्यांमध्ये नॉन AC स्लीपर क्लास कोच बसविण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. आतापर्यंत या ट्रेनमध्ये फक्त वातानुकुलीत डबे असायचे. शुक्रवारी रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने यासंदर्भातील ही माहिती दिली.

तत्काळ तिकिटाचे भाडे घटले :
अधिक माहिती देताना अधिकाऱ्याने सांगितले की ही सुविधा केवळ ३५ हमसफर गाड्यांना देण्यात आली आहे ज्यांच्याकडे सध्या फक्त एसी – ३ श्रेणीचे डबे आहेत. या अधिकाऱ्याने सांगितले की, हमसफर गाड्यांमध्ये तात्काळ तिकीटाचे भाडेही कमी करण्यात आले आहे. त्यांची किंमत आता मूळ भाड्याच्या १.५ पट ऐवजी १.३ पट असेल.

या ट्रेन पासून बदल सुरू होणार :
अलाहाबाद ते दिल्ली हमसफर एक्स्प्रेसच्या सुविधेत ही वाढ सर्वात आधी केली गेली आहे. ही देशातील अशी पहिली हमसफर क्लास ट्रेन आहे जिच्यात फ्लेक्सी आणि नॉन फ्लेक्सी अशा दोन्ही सुविधा पुरवल्या जातील. अलाहाबाद हमसफर एक्स्प्रेस शुक्रवार १३ सप्टेंबरपासून दिल्ली येथे काम सुरू होणार आहे. प्रयागराज एक्स्प्रेसनंतर अलाहाबाद जंक्शन येथून सुटणारी ही दुसरी रेल्वे गाडी असेल जी दररोज दिल्लीला जाईल.

हमसफर एक्स्प्रेस आठवड्यातून तीन दिवस आनंद विहार टर्मिनलपर्यंत चालत असे. दुरांतो बंद झाल्यानंतर आता हमसफर तीन दिवस आनंद विहार आणि चार दिवस नवी दिल्ली येथे जाईल. शुक्रवारी जेव्हा ट्रेन सुटेल तेव्हा प्रथमच एसी तृतीय सोबत स्लीपर क्लाससह चार डबे जोडले जातील. पहिल्या प्रवासात हमसफरच्या स्लीपरमध्ये वेटिंग लिस्ट आहे.

फ्लेक्सी फेअर थर्ड एसीमध्ये असणार :
रेल्वेने त्याच्या स्लीपरमध्ये फ्लेक्सी फेअर लावला नाही. यामुळे अलाहाबाद ते आनंद विहार पर्यंत हमसफरचे भाडे ४२० रुपये आणि नवी दिल्लीचे ४२५ रुपये निश्चित करण्यात आले आहे. तर हमसफरच्या तिसर्‍या एसीमध्ये फ्लेक्सी फेअर पूर्वीप्रमाणेच राहील. त्याचे किमान भाडे १११५ आणि जास्तीत जास्त भाडे दिल्लीसाठी १६२५ रुपये आहे.

दुरांतोच्या तुलनेत हमसफरमध्ये १९२ बर्थने वाढ :
हमसफर एक्स्प्रेसमध्ये दुरांतो एक्स्प्रेसपेक्षा एकूण १९२ बर्थ अधिक आहेत. सर्व विभागांसाठी दुरंतोकडे एकूण १२६० बर्थ होते. परंतु हमसफरमध्ये ही संख्या वाढून १४७२ झाली आहे. हमसफरमध्ये थर्ड एसीचे १६ कोच आणि स्लीपरचे चार कोच असतील. दुरांतोकडे स्लीपरचे नऊ कोच, थर्ड एसीचे पाच, एसी २ चे तीन आणि एसीचे १ चा कोच होता.