Indian Railways मध्ये सर्वात मोठा बदल होणार, 42 महिन्यात रचणार इतिहास

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोनाचे संकट असल्याने देशातील रेल्वे सेवा बंद आहे. यादरम्यान भारतीय रेल्वे अनेक मोठ्या सुधारणा करत आहे. रेल्वे मंत्रालयाकडून सतत नव्या गोष्टींवर प्रयोग केले जात आहेत. अधिकाधिक सुविधा देण्यासाठी रेल्वेत सुधारणा केल्या जात आहेत. मग ती बॅटरीवर चालणारी ट्रेन असो किंवा 2.8 किमीची मालगाडी रुळावर यशस्वीपणे चालवण्याचा प्रयत्न असो.

आता रेल्वेने आणखी एक मोठी घोषणा केली आहे. ती पूर्ण झाल्यानंतर सर्वात मोठा बदल आपल्याला पहायला मिळणार आहे. रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी मोठी घोषणा करताना सांगितले की, भारतीय रेल्वे पूर्णपणे वीजेवर धावणार आहे. पुढच्या साडे तीन वर्षात रेल्वेचे संपूर्ण विद्युतीकरण करण्यात येणार आहे. सीआयआयने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात गोयल यांनी ही घोषणा केली. 2024 पर्यंत संपूर्ण रेल्वे मार्गांचे रेल्वेचे 100 टक्के विद्युतीकरण पूर्ण करण्यात येईल. यामुळे संपूर्ण विद्युतीकरणावर धावणारी भारतीय रेल्वे ही जगातील दुसरी रेल्वे असणार आहे.

भारतीय रेल्वे वेगाने आपल्या रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण करत आहे. विद्यमान स्थितीत भारतीय रेल्वेच्या 55 टक्के नेटवर्कचे विद्युतीकरण झाले आहे. आता पुढच्या 3.5 वर्षात उर्वरीत मार्गांचे विद्युतीकरण पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. यानंतर रेल्वेचे 100 टक्के विद्युतीकरणाचे लक्ष्य पूर्ण होईल, सर्व रेल्वे गाड्या विजेवर धावतील, असं गोयल यांनी सांगितले.

नुकतेच पंतप्रधान मोदी यांनी रेल्वेच्या 100 टक्के विद्युतीकरणाच्या योजनेला मंजूरी दिली आहे. या मंजुरीनंतर रेल्वे संपूर्ण विद्युतीकरण करण्याच्या मार्गावर वेगाने पुढे जात आहे. यानुसार 1.20 लाख किमी मार्गावर काम करण्यात येणार आहे. पंतप्रधान मोदींनी ‘वन सन वन वर्ल्ड,वन ग्रीड’ला चालना दिली आहे. आम्ही त्यावर काम करतोय. 2030 पर्यंत भारतीय रेल्वे ही जगातील सर्वात मोठी ग्रीन रेल्वे असेल, अशी अपेक्षा पियुष गोयल यांनी व्यक्त केली.