पाऊस, पूर ओसरल्याने भीमा खोऱ्याला दिलासा ; पंढरपूरातील पूर ओसरण्यास सुरुवात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – हवामान विभागाने अतिवृष्टीच्या इशारा दिल्यानंतरही तेवढा पाऊस घाटमथ्यावर न झाल्याने नद्यातील विसर्ग लक्षणीय घटविण्यात आला असल्याने जिल्ह्यातील पुराची परिस्थिती झपाटल्याने ओसरली आहे. त्यामुळे पुणे, पिंपरी चिंचवडसह भीमा खोऱ्यातील नागरिकांना दिलासा मिळाल आहे.

खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग गुरुवारपासून झपाट्याने कमी करण्यात आला असून सध्या धरणातून केवळ ८५६ क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे. यामुळे पुणे शहरातील पूर ओसरला आहे. पवना धरणातून ३ हजार क्युसेक पाणी सोडण्यात येत असून मुळशी धरणातून ४ हजार २०० क्युसेक पाणी सध्या सोडले जात आहे. यामुळे सर्वच परिसरातील पूर ओसरला आहे. सध्या पुणे जिल्ह्यातील घोडनदी धरणातून सर्वाधिक १९ हजार ८८० क्युसेक पाणी घोडनदीत सोडण्यात येत आहे.

सध्या दौंड येथून भीमा नदीत १ लाख ५८ हजार क्युसेक पाणी वाहत आहे. वीर धरणातून आता १३ हजार क्युसेक विसर्ग सुरु आहे. त्यामुळे निरा, नरसिंहपूर येथे सध्या भीमा नदी धोक्याच्या पातळीवरुन वाहत आहे. पंढरपूर येथे सध्या चंद्रभागा नदीत ३ लाख २४ हजार क्युसेकने पाणी वाहत असून ते धोक्याच्या पातळीपेक्षा ४ मीटरवरुन वाहत असले तरी उजनी धरणातून गुरुवारी १ लाख २० हजार क्युसेक पाणी सोडण्यात येत होते. ते आता निम्म्याहून कमी केले असून सध्या धरणातून ६० हजार क्युसेक पाणी सोडले जात आहे. त्यामुळे पुढील काही तासात पंढरपूरमधील पूराचे पाणी ओसण्यास झपाट्याने सुरुवात होणार आहे.