दमदार पावसाने हवेलीकर आनंदीत

थेऊर : पोलीसनामा ऑनलाइन – संपूर्ण मृग नक्षत्रात दडी मारल्यानंतर पावसाने आज सायंकाळी पूर्व हवेलीतील गावामध्ये जोरदार आगमन केले. त्यामुळे वातावरणातील उष्मा कमी झाला उकाड्याने बेहाल झालेल्या नागरिकांना या पावसाने मोठा दिलासा मिळाला.

निसर्ग वादळाच्या दरम्यान हवेली तालुक्याच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडला परंतु त्यानंतर या भागात चांगला पाऊस पडलाच नाही तर त्याने मराठवाड्यात चांगली हजेरी लावली. गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीची उष्णता वाढली परिणामी अंगाची लाही होत होती. प्रत्येक जण पावसाची मोठ्या आतुरतेने वाट पाहत होते. आज सोमवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास आकाशात काळेभोर ढग जमा झाले त्यावेळी हवेत बाष्पाचे प्रमाण वाढले होते.

त्यानंतर चार वाजण्याच्या सुमारास जोरदार विजांच्या कडकडाट व ढगांच्या गडगडासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली त्यानंतर पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. या पावसाने जागोजागी पाणी साचले होते. सायंकाळपर्यंत या पावसाची रिपरिप चालू होती. या पावसामुळे सर्वसामान्य तर आनंदी झाला परंतु याचा शेतकरी वर्गास मोठा फायदा झाला आहे. पूर्व भागातील बहुतेक सर्वच गावामध्ये पाऊस पडला