वादळी वाऱ्यासह बरसला ‘मेघराज’ ; केळी भुईसपाट

परभणी : पोलीसनामा ऑनलाईन – पाथरी तालुक्यात मान्सूनपुर्व, पडलेल्या पावसाने वातावरणात बदल झाल्याने काहीसा दिलासा मिळाला.

मंगळवारी 04 जुन रोजी सायंकाळच्या सुमारास तालुक्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार पावसाने शेकडो हेक्टरवरील केळीला फटका बसला आहे. तर काही ठिकाणी शेतातील वृक्ष उन्मळून पडले आहेत, दरम्यान तालुक्यातील बाभळगांव मंडळात जोरदार वादळी वाऱ्यात शेकडो हेक्टर क्षेत्रावरील केळी आडवी झाल्याने केळी उत्पादकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. प्रशासनाने पंचनामे करण्याची मागणी होत आहे.

वादळी वाऱ्यात विजेचे खांब व तारा तुटल्याने सलग तीन दिवस बाभळगांव ( 33 केव्हीचा) विज पुरवठा खंडित झाल्याने ग्रामस्थ व शेतकऱ्यांची गैरसोय झाल्याचे चित्र दिसले. शेत आखाड्यावरील गुरा ढोरांची पिण्याच्या पाण्याची सोय लावणे कठीण गेले.

जोरदार वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने पाथरी शहरासह ग्रामीण भागाला तडाखा दिला. मंगळवारी सायंकाळच्या सुमारास वातावरणात बदल होत वादळी वाऱ्यासह पावसाने कहर केला.

वादळी वाऱ्यात अनेक ठिकाणी घरे, दुकाने, शेत आखाड्यावरील जनावरांची गोठे या वरील पञे उडाली तर वृक्ष उन्मळून पडले.

वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटत पावसाने हजेरी लावून चांगलीच धावपळ उडवली. पाऊस व वादळी वाऱ्याचा वृक्षांना ही फटका बसला. अनेक भागात वृक्ष उन्मळून पडले, सोनपेठ रोडवरील बाभळगांव फाटा ते गांव यादरम्यान रोडवर झाड फाटा तुटून पडल्याने वाहतूकीला अडथळा निर्माण झाला होता. वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसामुळे दोन तीन दिवस जनजीवन विस्कळीत झाले.
अनेक ठिकाणी विजेच्या तारा, खांब, व वृक्ष उन्मळून पडले आहेत तर घरावरील पञ ही उडुन गेले.