माढा, सांगोला, करमाळा, बार्शी परिसरात वादळी वार्‍यासह गारांचा पाऊस

सोलापूर : पोलीस नामा ऑनलाइन – सोलापूर जिल्ह्यातील सांगोला, करमाळा, माढा, बार्शी आदी तालुक्यातील विविध भागात काल रविवारी सायंकाळी वादळी वा-यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. माढा, बार्शी परिसरात तर गारांचा पाऊस झाला. आणि विजेचा कडकडाट होऊन बार्शी येथे शेतातील नारळाच्या झाडावर वीज पडली.

बार्शी व सांगोला शहरातही काही भागात पावसाने हजेरी लावल्याची माहिती समोर आली आहे.
करमाळा तालुक्यातील हिसरे, फिसरे व सालसे परिसरात रविवारी दुपारी पाच वाजण्याच्या सुमारास जोरदार अवकाळी पाऊस पडला. बार्शी तालुक्यातील पानगांव येथे वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात वीज पडून गाय ठार झाल्याची माहिती सांगण्यात आली. अक्कलकोट तालुक्यातील गळोरगी येथे वीज पडून बैल ठार झाला आहे. तर अनेक गावांत वादळी वारा आणि विजेचा कडकडाट पाहण्यास मिळाला, हांनुर येथील प्रगतशील शेतकरी प्रवीण हताळे यांनी सांगितले की, वारा मोठा होता आणि विजा मोठया प्रमाणावर कडकडाट करत होत्या.

दरम्यान, मागील दोन ते तीन दिवसांपासून सोलापूर शहरासह ग्रामीण भागातील हवामानात मोठा बदल झाला होता. प्रचंड उन असल्यामुळे सोलापूर शहरासह जिल्ह्यातील तापमानात मोठी वाढ झाली होती, त्यामुळे उष्णता मोठ्या प्रमाणावर वाढली होती. काल रविवारी सकाळपासूनच उकाडा जाणवत होता. चार वाजल्यापासून जिल्ह्याच्या काही भागात वादळी वारे जोरात वाहू लागले होते. दरम्यान, सायंकाळी सहाच्या सुमारास पावसाने हजेरी लावली़ काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला तर काही ठिकाणी गारांचा पाऊस पडल्याची माहिती समोर आली आहे. बार्शी येथे शेतात असलेल्या नारळाच्या झाडावर वीज पडून ते झाड जळल्याची घटना घडली.

काल झालेल्या वादळी पावसामुळे गहू, मका, कांदा आणि आंबा पिकाचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. भाजीपाला पिकांचे ही मोठे नुकसान झाले. अचानक आलेल्या पावसाने शेतकऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली. गेल्या दोन दिवसांपासुन वातावरणात बदल झाल्याने सकाळपासून मोठ्या प्रमाणात उष्णता होती. दुपारच्या नंतर आणखी उकाडा वाढल्याने सायंकाळी पाचवाजेच्या सुमारास येथे वादळीवाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. वादळी पावसाचा प्रामुख्याने कांदा व गहू पिकाला फटका बसला आहे.  तर मिरची आणि आंबा पिकाचे मोठे नुकसान झाल्याची माहिती अक्कलकोट तालुक्यातील हांनुर चे शेतकरी प्रवीण हताळे यांनी पोलीसनामा प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. अचानकपणे वारा आणि विजेचा कडकडाट होऊन पाऊस पडण्यास सुरवात झाली असे त्यांनी सांगितले दरम्यान माढा, बार्शी, करमाळा व मंगळवेढा, बार्शी या भागात वादळी वारा आणि पाऊस मोठयाप्रमाणात झाला असल्याचे कळते.