राज्यात उद्यापासून पावसाची शक्यता : हवामान विभाग

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – ह्यावर्षी राज्यात सरासरी पेक्षा जास्त पाऊस पडला. ऑगस्टच्या पहिल्या दहा दिवसांमध्ये कोसळलेल्या मुसळधार पावसाने राज्यात बहुतांश ठिकाणी पूरस्थिती निर्माण केली होती. त्यानंतर पाऊस आता पुन्हा सक्रिय होत आहे. राज्यात पावसासाठी पोषक हवामान होत असल्याने उद्यापासून (ता. 17) राज्यात पावसाला सुरवात होणार आहे. तर गुरुवारपासून (ता. 19) पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मध्य भारतातील कमी दाबाचे क्षेत्रामुळे मध्य प्रदेश, पूर्व राजस्थान, गुजरात राज्यात जोरदार पाऊस पडला. तसेच उत्तर कोकणातील पालघर, ठाणे, रायगड जिल्ह्यांतही काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. तसेच राज्यात पावसासाठी पोषक हवामान निर्माण होत असल्यानं कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी उद्यापासून पाऊस पडण्याची शक्यता असून गुरुवारपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

कोकणातील रायगड, पालघर जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी आज जोरदार पावसाचा, तर उर्वरित राज्यात हलक्या सरींचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.