पावसाने पुणेकरांना पुन्हा ‘झोडपलं’, येरवडा – कात्रज भागात पाणीच पाणी, बस पाण्यात अडकली

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मध्यरात्री १२ वाजता सुरु झालेल्या जोरदार पावसाने पुणेकरांना रात्रभर झोडपून काढले. या पावसामुळे शहराच्या अनेक भागातील घरात पाणी शिरले. कात्रज आणि येरवडा भागात जोरदार पाऊस बरसला. त्यामुळे आंबिल ओढ्याला पाणी आल्याने अनेकांच्या घरात पाणी शिरले. या पावसामुळे येरवडा, शांतीनगर, घोरपडी गाव, वानवडी, आझादनगर, बी टी कवडे रोड, पद्मावती, मार्केटयार्ड भागातील घरामध्ये पाणी शिरले होते.

रात्रभर झालेल्या या पावसाची पुणे वेधशाळेत ४२ मिमी इतकी नोंद झाली आहे. लोहगाव जकात नाक्याजवळ रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते. सकाळी साडेसहा वाजता कामगारांना घेऊन जाणाऱ्या बसचालकाने या पाण्यात बस घातली. मात्र, पाण्याच्या मध्येच बस बंद पडली. ती काही केल्या सुरु होईना. या बसमध्ये २३ जण अडकून पडले होते. अग्निशामक दलाच्या जवानांनी तातडीने तेथे धाव घेतली. अग्निशामन दलाचे जवाने रघुनाथ भोईर, महेश मुळीक, उमेश डगळे, विलिन रावतू, सोपान पवार यांनी या कामगारांना रश्शीच्या सहाय्याने सुखरुप बाहेर काढले.

म्हात्रे पुलावरुन कर्वे रोडला येणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने हा रस्ता बंद करावा लागला होता. पाऊस थांबल्यानंतर काही वेळाने पाणी ओसरले. कात्रज येथे रात्री ३६ मिमी पाऊस झाला. यामुळे कात्रज तलाव व परिसरातील पाणी आंबिल ओढ्याला वाहून येऊन ओढ्याला पूर आला.२५ सप्टेंबरला आलेल्या पुरात सीमा भिंत कोसळून त्यात पद्यावती भागातील गुरुराज सोसायटीचे मोठे नुकसान झाले होते.

आजही पहाटे गुरुराज सोसायटीमध्ये पुन्हा पाणी शिरले. सोसायटीतील ५ इमारतीच्यातळमजल्यावरील फ्लॅटमध्ये पाणी शिरुन मोठे नुकसान झाले. अनेक भागातील घरात पाणी शिरल्याने अग्निशामन दलाकडे रात्रभर फोन येत होते. सकाळी सात वाजता पाऊस थांबल्यानंतर काही वेळाने पाणी ओसरले.

Visit : Policenama.com