Rain Updates : पुढच्या काही तासात पुण्यासह 10 जिल्हयात वादळी वार्‍यासह पाऊस !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   परतीच्या पावसाने राज्यात हाहा:कार माजवला आहे. परतीच्या पावसाचा फटका राज्यातील काही जिल्ह्यांना बसला आहे. परतीच्या पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अजूनही काही दिवस महाराष्ट्राला पावसाचा तडाखा सहन करावा लागणार आहे. कारण राज्यातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गसह काही जिल्ह्यांमध्ये पुढील 3 ते 4 तासांमध्ये वादळी वाऱ्यासह व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

यासंदर्भात मुंबईतील प्रादेशिक हवामान केंद्राने अंदाज वर्तवला आहे. त्यानुसार रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढील 3 ते 4 तासांमध्ये वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार आहे. तसेच, अशीच परिस्थिती ठाणे, नाशिक, पुणे, अहमदनगर, औरंगाबाद, नंदुरबार, जळगाव आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्येही असणार आहे, अशी शक्यता मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तवली आहे.

दरम्यान, मराठवाड्यासह राज्यातील काही भागात गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे सुगीच्या काळात शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे ज्या भागात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्या ठिकाणच्या नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.