राज्यभर पावसाचा ‘रुद्रावतार ! अतिवृष्टीमुळे ‘सोयाबीन’, ‘तूर’ आणि ‘भाता’चे मोठे नुकसान

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्याला अतिवृष्टीचा तडाखा बसला आहे. गेल्या चार दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे राज्यभर पावसाचा रुद्रावतार पहायला मिळत आहे. गुरुवारी मध्य महाराष्ट्राला अतिवृष्टीचा तडाखा बसला. बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे भीमा व कृष्णा नदीला पूर आल्याने पंढरपूर आणि सांगलीमध्ये पूरस्थिती निर्माण झाली. पूरामध्ये अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी नेण्यासाठी एनडीआरएफची मदत घेण्यात आली.

पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा, विदर्भ सर्वत्रच जोरदार पाऊस झाला. दुष्काळी भागातही जोरदार बरसलेल्या पावसामुळे विविध भागामध्ये शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. लाखो हेक्टरवरील सोयाबीन व भात पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. तूर भात पिकांनाही अतिवृष्टीचा तडाखा बसला आहे. रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने अनेक ठिकाणची वाहतूकही बंद करण्यात आली होती. अद्यापही पाऊस सुरु असून हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार आणखी चार दिवस असाच पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.

रात्र काढली झाडावर

कारने गावाकडे निघालेल्या लोकांना ओढ्याच्या पाण्याचा अंदाज आला नसल्याने दुर्घटना घडली. कारमध्ये असलेल्या एका मित्राचा डोळ्यादेखत जीव गेला तर दोघांना झाडाने वाचवले. या दोघांनी संपूर्ण रात्र जीव मुठीत धरुन झाडावरच काढली. पूर ओसरल्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली.

पोलिसांनी वाचवले दोघांचे प्राण

लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील नेलवाड शिवारात पुलावरून रस्ता ओलांडत असताना पाण्यात पडलेल्या दोघांना एका पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:चा जीव धोक्यात घालून वाचवले. ही घटना बुधवारी घडली असून कासार सिरसी पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक मन्मथ धुमाळ असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. धुमाळ हे मंगळवारी नेलवाड येथे तलावालगतच्या पुलावर कर्तव्यावर असताना दोघेजण वाहून जात असल्याचे त्यांनी दिसले. पण दोघेही ओढ्याच्या प्रवाहात जवळपास 20 फुट अंतरावर एका झाडाला अडकल्याचे पाहून धुमाळ यांनी लागलीच पाण्यात उडी घेतली तसेच उपस्थितांनी दोरी टाकून दोघांनाही बाहेर काढले.

सिंधुदुर्गमध्ये भात पिकाचे मोठे नुकसान

परतीच्या पावसाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात भात पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 55 हजार हेक्टर पैकी 10 हजार हेक्टर क्षेत्राखालील भात पिकाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. दरम्यान, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर या जिल्ह्यांना रेड अलर्ट जाहीर केला आहे.

चंद्रभागेने ओलांडली धोक्याची पातळी

उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरु असलेल्या पावसामुळे उजनी धरणातून 1 लाख 40 हजार क्युसेक पाणी सोडण्यात आले असून, त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. धरण क्षेत्रात सतत होत असलेल्या पावसामुळे धरणांच्या पाणी पातळीत वाढ होत असून, त्यामुळे भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. वीर धरणातून 32 हजार पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. हे पाणी सोलापूर जिल्ह्यातील भीमेच्या पात्रात दाखल झाले असून, भीमा नदी या पावसाळ्यात पहिल्यांदाच दुथडी भरुन वाहत आहे. आतापर्यंत आठ हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.