राज्यात पुढील 2 ते 3 आठवडे ‘कोरडे’च, ‘हवामान’ विभागाचा अंदाज

नवी दिल्ली : वृत्तसंस्था हवामान विभागाने आज व्यक्त केलेल्या अंदाजानुसार महाराष्ट्रात पुढील दोन ते तीन आठवडे कोरडे हवामान राहणार आहे. मागील दोन आठवडे जोरदार पावसाने हजेरी लावल्यानंतर गेल्या चार ते पाच दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला आहे. त्यामुळे राज्यातील पूरपरिस्थिती असलेला भाग म्हणजेच कोल्हापूर, सातारा, सांगली भागातील लोकांना दिलासा मिळाला आहे.

पुढील दोन-तीन आठवडे राज्यात कोरडे हवामान राहणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले असून राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या सरींची शक्यता देखील सांगितली गेली आहे. गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात पाऊस पडण्यास पोषक असणारी हवामानाची परिस्थिती कमकुवत झाल्याने पावसाचे प्रमाण कमी होणार आहे. त्यानुसारच पुढील दोन-तीन आठवडे राज्यात कोरडे हवामान राहणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले.

जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्य़ापासून ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्य़ापर्यंत राज्यात मुसळधार पाऊस पडला. यामुळे राज्यात कोल्हापूर, सांगलीसह नाशिक, महाबळेश्वर आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी अतिवृष्टीने पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. याचे कारण कमी दाबाच्या क्षेत्रांमुळे निर्माण झालेली स्थिती हे होते. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्य़ांचे अस्तित्व आता अल्पकाळ राहणार असल्याने त्यामुळे पावसाचा जोर कमी होत जाणार आहे. सध्या कमी दाबाचा पट्टा हिमालयाच्या पायथ्याशी सरकत असल्याने त्यामुळे ओडिसा, बिहार आणि पूर्व उत्तर प्रदेशातील काही ठिकाणी पाऊस हजेरी लावू शकतो.

आरोग्यविषयक वृत्त

 

You might also like