Nagpur News : जिल्ह्यात उद्या पावसाचा इशारा

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्याने जिल्ह्यात १६ फेब्रुवारीला तुरळक पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाच्या, प्रादेशिक हवामान केंद्राने दिला आहे. तसेच १७ व १८ तारखेला विजांच्या कडकडाटात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. काही ठिकाणी गारपिटीची ही शक्यता वर्तवण्यात आली आहे.

अनेक ठिकाणी पिकांची काढणी सुरु असून, शेतातील उभ्या पिकांचे या अवकाळी पावसाने नुकसान होण्याची शक्यता आहे. गव्हाच्या ओंब्या भरण्याच्या बेतात आहे, तर हरभरा आणि अन्य पिकेही पक्व होण्याच्या बेतात आहेत. त्यामुळे काढणीला आलेल्या पिकांचे योग्य नियोजन करुन रक्षण करावे व हरभरा, तूर, जवस आदी पिकांची योग्य ठिकाणी साठवणूक करावी. कापसाची राहिलेली वेचणी, भाजीपाला पिके, संत्रा, मोसंबी, लिंबू आदी फळबागांमध्ये पाण्याचा निचरा होईल, अशी योजना करावी, असा सल्ला शेतकऱ्यांना देण्यात आला आहे.

यादरम्यान वीज पडण्याचा धोका असल्याने शेतावर अथवा मोकळ्या ठिकाणी काम करणाऱ्या शेतकऱ्यांनी त्याचसोबत शेतमजुरांनी योग्य ती काळजी बाळगावी, असा सल्लाही प्रादेशिक हवामान केंद्राने दिला आहे.