कोकण व मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात पुन्हा पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे. कोकण व मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पावसाच्या दीर्घकालीन विस्तारित पूर्वानुमानानुसार दोन दिवसांत राज्यात अनेक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून, नंतरच्या दोन आठवड्यांत मराठवाड्यात काही प्रमाणात पावसाचे प्रमाण कमी होणार आहे. पण, इतर ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस राहणार आहे.

गेल्या २४ तासात कोकण, गोव्यातील डहाणु १३०, अलिबाग, दापोली, मालवण, मुंबई (कुलाबा) १२०, रामेश्वरी, रोहा ११०, रत्नागिरी १००, हर्णे, खेड, वेंगुर्ला ९०, चिपळूण, देवगड, लांजा, मंडणगड, मुरड, सावंतवाडी, श्रीवर्धन ८० मिमी पावसाची नोंद झाली आहे. मध्य महाराष्ट्रातील गगनबावडा, पाथर्डी ७०, शेवगाव ६०, अहमदनगर, महाबळेश्वर ५०, राहुरी, तळोदा ४०, लोणावळा ३० मिमी पावसाची नोंद झाली. तसेच अनेक ठिकाणी हलका पाऊस झाला असून

मराठवाड्यातील अंबड, कैज ५०, अंबाजोगाई, मोमीनबाद, भोकरदन, पैठण, शिरुर कासार ४० मिमी पाऊस नोंदवला गेला. विदर्भातील शेगाव, नागपूर १००, हिंगणा ९०, बाळापूर, खारंगा ८०, काटोल, साकोली ७०, आष्टी, चंद्रपूर, पौनी,खडक अर्जुनी, सेलू ६० मिमी पावसाची नोंद झाली. घाटमाथ्यावरील धारावी १६०, ताम्हिणी १००, कोयना (पोफळी) ९०, भिरा ७०, दावडी ५० मिमी पाऊस झाला. तर इतर काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला आहे.

इशारा – कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात १६ जुलै रोजी तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तर विदर्भातील तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. १७ जुलै रोजी कोकण, गोवा मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.

– बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मुंबई ३९, सांताक्रूझ ८०, अलिबाग १४, रत्नागिरी २९, पणजी ६३, डहाणू १९, महाबळेश्वर १९, जळगाव ५०, सांगली १०, अकोला १०, बुलढाणा २२, चंद्रपूर ६५, ब्रम्हपुरी २२ मिमी पावसाची नोंद करण्यात आली.
– कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हातील तुरळक ठिकाणी पुढील ३ दिवस मुसळधार पावसाची शक्यता.
– नाशिक, पुणे,सातारा जिल्हातील घाट परिसरात १६ जुलै रोजी तुरळक ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे. धुळे, कोल्हापुरात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे. तर विदर्भातही काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.