महाराष्ट्रातील नव्या बांधकामांवरील बंदी तूर्तास उठवली

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन 

घनकचरा व्यवस्थापनाबाबत पावले न उचलल्याने सर्वोच्च न्यायालयाने नव्या बांधकामांना परवानगी देण्यास सरसकट बंदी घातली होती. त्यामुळे संपूर्ण देशासह महाराष्ट्रात शासन व महापालिकांमध्ये गेले आठवडाभर संभ्रम निर्माण झाला होता. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने खडबडून जागे झालेल्या फडणवीस सरकारच्या वकिलांनी आपली बाजू मांडल्यानंतर बुधवारी महाराष्ट्रातील नव्या बांधकामांवरील बंदी अखेर सर्वोच्च न्यायालयाने उठवली आहे. महाराष्ट्र आणि उत्तराखंड यांना सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी हा दिलासा दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे राज्य सरकार आणि बांधकाम व्यवसायाला मोठा दिलासा मिळाला आहे.

[amazon_link asins=’B06XTJR9WV,B01MA1JLOM,B071DJPLX7′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’402248bf-b187-11e8-adc6-1b4acab7430a’]

डेंग्यूमुळे दिल्लीत एका सात वर्षाच्या मुलाच्या मृत्यूनंतर सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भात सुमोटो अंतर्गत जनहित याचिका दाखल करुन घेतली होती. वारंवार निर्देश देऊनही देशातील अनेक राज्य सरकार घनकचरा व्यवस्थापना संदर्भात दिलेले निर्देश गांभीर्याने घेत नसल्याचे यावेळी न्यायालयाच्या निर्दशनास आणून देण्यात आले.  याची गंभीर दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र, उत्तराखंड, चंदीगड, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश यांच्यासह काही केंद्रशासित  प्रदेशांतील नव्या बांधकामांवर बंदी घालत आर्थिक दंडही ठोठावला होता.

घनकचरा व्यवस्थापनाच्या मुद्यावरून गेल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रासह अन्य काही राज्यांतील नव्या बांधकामांवर बंदी घातली होती.  फडणवीस सरकारने सर्वोच्च न्यायालयात आपली बाजू योग्यरीतीनं मांडण्याचे आदेश आपल्या वकिलांना दिले होते. त्यानुसार राज्याच्या वकिलांनी न्यायालयापुढे आपली बाजू मांडली.

जाहीरात

घनकचरा व्यवस्थापनाबद्दल आपले निश्चित धोरण हे गेल्या वर्षीच तयार झाले असून त्याची अंमलबजावणीही सुरू झालीय. गेल्या सुनावणीच्या वेळी हजर असलेले वकील योग्य माहिती उपलब्ध नसल्याने वास्तविक परिस्थिती न्यायालयासमोर मांडू शकले नाहीत, असे स्पष्टीकरणही सर्वोच्च न्यायालयापुढे देण्यात आले. या मुद्यांची दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रासह उत्तराखंड राज्यावरील बंदी तूर्तास उठवलीय. यासंदर्भातील याचिकेवर १० आॅक्टोबरला पुढील सुनावणी होणार आहे.

लवासा दिवाळखोरीच्या वाटेवर, लवादासमोर सुनावणी