बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडून ‘जय श्रीराम’चे नारे देत सार्वजनिक शौचालयाची तोडफोड

लखनऊ : पोलीसनामा ऑनलाईन –  बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी जय श्रीराम’ची घोषणाबाजी करत सार्वजनिक शौचालयाची तोडफोड केली. शौचालय मंदिराच्या भिंतीजवळ असल्याचे म्हणत बुधवारी दुपारी साडेअकराच्या सुमारास कार्यकर्त्यांनी शौचालयाची तोडफोड केली आहे. उत्तर प्रदेशच्या सहारनपूरमध्ये ही घटना घडली आहे.

सहारनपुरमध्ये गेल्या 40 वर्षापूर्वी बांधलेले एक सार्वजिक शौचालय आहे. नुकतेच या शौचालयाचे आधुनिकीकरण केले होते. सदर शौचालय मंदिराच्या भिंतीपासून काही फुटांच्या अंतरावर आहे. तसेच मंदिर आणि शौचालयादरम्यान एक छोटीसी गल्ली देखील आहे. मंदिराच्या आणि शौचालयाच्या जवळच बसथांबा असल्याने अनेक प्रवाशी शौचालयाचा वापर करतात. मात्र बुधवारी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी ‘जय श्रीराम’, ‘एक ही नारा एक ही नाम – जय श्रीराम जय श्रीराम’ अशा घोषणा देत हातोड्यांनी शौचालयाची तोडफोड केली. यामध्ये महिला आणि दिव्यांगासाठी बनवलेल्या शौचालयाचा देखील समावेश होता.

अखिल भारत हिंदू महासभेचे पश्चिम उत्तर प्रदेश अध्यक्ष असल्याचे सांगत विष सिंह कंबोज यांनी शौचालयावरील हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे ‘दोन दिवसांपूर्वी आमचे हिंदू योद्धे इथे आले होते. त्यांनी दोन दिवसांचा अल्टिमेटम दिला होता. परंतु, इथे कोणतीही कारवाई झाली नाही त्यामुळे आम्हीच हे शौचालय नष्ट केल्याचे कंबोज यांनी म्हटले आहे. दरम्यान शौचालयाची नासधूस करणाऱ्या लोकांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल असे प्रशासनाने म्हटले आहे.