home page top 1

‘असं’ व्यंगचित्र काढून राज यांनी आरक्षणाच्या निर्णयावरुन मोदींना लगावला टोला 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मनसे अध्यक्ष राज ठाकरे वेळोवेळी आपल्या व्यंगचित्रातून राग, किंवा सरकार प्रति आक्रोश व्यक्त करत असतात. त्यामुळेच मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींना व्यंगचित्रातून लक्ष्य केलं आहे. या व्यंगचित्रामध्ये पंतप्रधान मोदी थापांचे पतंग उडवत आहे. अमित शहा, भक्त आणि काही नेतेमंडळी मीडियासोबत मोदी पतंग उडवत आहेत.
मोदी, अमित शहा, भक्त आणि काही मीडियातील लोकांसोबत पतंग उडवत आहेत. त्या पतंगावर ‘नव्या थापा 10% आरक्षण’ असा मजकूर लिहिला आहे. मोदी आणि आसपासचा गोतावळा आनंदानं पतंग उडवत असल्याचं राज यांनी व्यंगचित्रात दाखवलं आहे. मात्र त्याच गच्चीवर असलेल्या भाजपनं याकडे पाठ फिरवली आहे.
मोदी सरकारनं गेल्याच आठवड्यात आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या सवर्णांना आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. यानंतर लगेचच संसदेत याबद्दलचं विधेयक मंजूर करुन घेण्यात आलं. मात्र अनेक घटनातज्ज्ञांनी हे आरक्षण तांत्रिकदृष्ट्या टिकणार नाही, असा अंदाज व्यक्त केला. त्यावरुन मोदींची नवी थाप असं व्यंगचित्र राज यांनी रेखाटलं आहे.
सवर्ण आरक्षणाच्या थापेचा पतंग आकाशात उडत असताना काही जुने पतंग मात्र गच्चीवर पडून आहेत. त्यातील  प्रत्येक पतंगावर मोदींची आश्वासनं, त्यांचे निर्णय आणि योजनांचा उल्लेख आहे. नोटाबंदी, स्वच्छ भारत, जीएसटी, देशी काळा पैसा, मेक इन इंडिया, डिझेल-पेट्रोलचे दर, कर्जमाफी, प्रतिवर्षी 2 कोटी रोजगार, परदेशी काळा पैसा, नीरव मोदी, मल्ल्या, चोक्सी आणि इतर असा मजकूर असलेले पतंग गच्चीवर पडल्याचं चित्र राज यांनी त्यांच्या व्यंगचित्रात दाखवलं आहे. मोदी केवळ थापांचे पतंग उडवतात. प्रत्येकवेळी नव्या थापा मारतात, असं राज यांनी व्यंगचित्रातून सुचवलं आहे.
Loading...
You might also like