Coronavirus : ‘कोरोना’शी लढणार्‍या मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे भाऊ राज ठाकरेंकडून कौतुक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक होत चालली आहे. या पार्श्वभूमीवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपले बंधू आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवर चर्चा केली आहे. त्यांनी आपल्या भावाच्या कामाचे कौतुक करत जनतेला आवाहन केलं आहे.

राज ठाकरे म्हणाले, यासंदर्भात काल माझं मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालंय. कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक बंद करण्यात आली आहे. पण आता पुढे जाऊन देशांतर्गत विमान वाहतूकही थांबवायला हवी, अशी सूचना आपण मुख्यमंत्र्यांना केली. ज्यांनी आजवर डॉक्टरांवर हात उचलले आहेत. त्यांना आता त्यांचं महत्व कळत असेल. त्या सर्वांना जाणीव झाली असेल की आपण काय चूक केली आहे.

कालचा जो बंद झाला मला अस वाटतंय की, काही मुठभर लोकांना याचं गांभीर्य अजूनही समजत नाही. जर भारतात हे पसरलं तर देशात 60 टक्के लोकांना याची लागण होऊ शकते, म्हणजे हा आकडा किती भयंकर असू शकतो याचा अंदाज यायला हवा. हे आवरण्यासाठी आपल्याकडे यंत्रणा आहेत का ? असा सवालही राज ठाकरे यांनी यावेळी केला आहे. जनतेला हात जोडून विनंती आहे. हे प्रकरण सहज घेऊ नका. निर्बंधांची 31 मार्चची तारीख पुढे जाणार असंच चित्र आहे. आज जी लोकं टोलनाक्यावर गर्दी करत आहेत. त्यांना विनंती आहे घरी बसा. जे काही चालू आहे ते आपल्या जगण्यासाठी चालू आहे असे आवाहन त्यांनी केले आहे.