पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Raj Thackeray | लोकसभा निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला होता. तसेच, राज ठाकरेंनी महायुतीच्या उमेदवारांसाठी राज्यात सभाही घेतल्या होत्या. दरम्यान आता आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (Maharashtra Navnirman Sena) घेतला आहे. (Pune Politics News)
लोकसभा निवडणुकीत महायुतीला साथ दिल्यानंतर राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा ‘एकला चलो रे’ची भूमिका घेतली आहे. विधानसभेसाठी त्यांनी उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत. मनसेने या विधानसभा निवडणुकीमध्ये पुण्यातील चार मतदारसंघांसह राज्यातील अनेक मतदारसंघांत उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. महत्वाचे म्हणजे राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे हे विधानसभा निवडणूक लढवत आहेत. (Maharashtra Assembly Election 2024)
मात्र असे असताना पुण्यातील कार्यकर्त्यांनी इतर उमेदवारांना पाठिंबा दिल्याची माहिती समोर आली आहे. या कार्यकर्त्यांविरोधात पक्ष कारवाई करण्याची शक्यता आहे. पुण्यात मनसेकडून स्थानिक पातळीवर काही अपक्ष आणि अन्य पक्षांच्या अधिकृत उमेदवारांना पाठिंबा देण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे.
याची दखल पक्षाच्या नेत्यांनी घेतली असून परस्पर असे निर्णय जाहीर करणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. यंदा मनसेकडून स्वबळावर निवडणूक लढविण्यात येत असल्याने कोणत्याही अपक्ष किंवा पक्ष आणि संघटनेच्या उमेदवारास मनसेकडून अधिकृत पाठिंबा देण्यात आलेला नाही.
असे असताना काही ठिकाणी स्थानिक पातळीवर पक्षाकडून पाठिंबा देण्यात आल्याची बाब पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आढळून आली आहे. अशातच परस्पर निर्णय जाहीर करणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे मनसे नेते अनिल शिदोरे आणि राजेंद्र उर्फ बाबू वागसकर यांनी जाहीर केले आहे.