कोहिनूर स्क्वेअर आणि राज ठाकरे यांच्यात नेमका काय संबंध ? जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – कोहिनूर मिल प्रकरणात झालेल्या आर्थिक गैरव्यवहाराबाबत  चौकशी करण्यात येणार आहे. या प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीने नोटीस बजावली आहे. येत्या गुरुवारी (ता.22) त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

विधानसभा निवडणूकांच्या तोंडावर हा मुद्दा समोर आल्याने राज ठाकरेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. राज ठाकरे या प्रकरणातून बाहेर का पडले या बाबत ईडी चौकशी करणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दादरमधील सेवाभवनासमोर कोहिनूर स्क्वेअर सारख्या दिसणाऱ्या दोन टॉवर्सचा प्रकल्प उभारण्याचे काम सुरु होते. शिवसेनेचे नेते मनोहर जोशी यांचा मुलगा उन्मेष जोशी यांची कोहीनूर सीटीएनएल कंपनी हे टॉवर्स उभारण्याचे काम करत होती. यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे, राजेंद्र शिरोडकर आणि उन्मेष जोशी यांनी कोहिनूर मिलची जागा खरेदी केली. त्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर लीजिंग अँड फायनांशियर सर्व्हिसेसकडून (आयएलएफएस) 860 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र त्यात आयएलएफएस कंपनीचे मोठे नुकसान झाले. त्यानंतर कंपनीने आपले शेअर्स फक्त 90 कोटींना विकले. त्यापाठोपाठ राज ठाकरे यांनी त्यांचे कंपनीतील शेअर्स विकले. त्यामुळे ईडीकडून आयएलएफएस कंपनीने दिलेले कर्ज आणि गुंतवणूकीबाबत चौकशी करण्यात येत आहे.

बॅंकांकडून कोहिनूर ग्रुप कंपनीने 900 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र कंपनीला कर्ज फेडता आले नाही. एकूण 2900 कोटींचा हा प्रकल्प असून कर्ज फेडता न आल्याने जोशी यांच्याकडून हा प्रकल्प निसटला आहे. त्यात शेअर्स विकल्यानंतरही ठाकरे कंपनीत सक्रिय असल्याचे सांगत ईडीने त्यांना चौकशीची नोटीस बजावली आहे. मागील दोन वर्षापासून हे काम बंद होते. आता प्रभादेवीमधील संदीप शिक्रे अँड असोसिएट्स कंपनीला हा प्रकल्प मिळाला असून त्यांनी काम सुरु केले आहे.

या प्रकरणावर संतापलेले मनसेचे प्रवक्ते संदीप देशपाडे यांनी मनसे अशा नोटीसांना भीक घालत नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

आरोग्यविषयक वृत्त-