राज ठाकरेंची विधानसभेची तयारी सुरु ; ‘या’ दिवशी ठरवणार ‘रणनिती’

मुंबई : पोलिसनामा ऑनलाइन – लोकसभा निवडणुकांचे अजून दोन टप्पे बाकी आहेत. लोकसभा निवडणूक न लढवणाऱ्या राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मात्र विधानसभेची तयारी सुरु केली आहे. येत्या १३ मे रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे ठाण्यात येत आहेत. यावेळी महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा राज्यव्यापी मेळावा होणार असल्याची माहिती मनसे ठाणे-पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिली आहे.

लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी “एकला चलो रे” अशी भूमिका घेतली होती. मात्र निवडणूक लढवली नसली तरी त्यांनी अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्याविरोधात प्रचारसभा घेतल्या होत्या. ‘लाव रे तो व्हिडीओ’ हे त्यांचे वाक्य या प्रचार सभांदरम्यान प्रचंड गाजले. आता सोमवारी ठाण्यात मेळावा घेऊन ते विधानसभेच्या तयारीसंदर्भांत महाराष्ट्रातील तालुका, जिल्हा आणि शहर अध्यक्षांशी संवाद साधणार आहेत. या निवडणुकीत कशा प्रकारे काम करायचे याचे मार्गदर्शन ते पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना करणार आहेत. २३ मे नंतर ते तीन महिने महाराष्ट्रभर दौरेही करणार असल्याचे जाधव यांनी सांगितले. ५०० प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित राहणार असल्याची माहिती यावेळी जाधव यांनी दिली.

दरम्यान, या मेळाव्यात राज ठाकरे काय भूमिका मांडणार आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीविषयी राज ठाकरे काय निर्णय घेणार या सगळ्याकडे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे लक्ष लागून आहे .