हरिसाल गावची बदनामी करणाऱ्या राज ठाकरेंना उपसरपंचाने दिले असे प्रत्युत्तर

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या प्रत्येक सभेतून नरेंद्र मोदी यांनी राबवलेल्या योजना कशा फसव्या ठरल्या याचे व्हिडीओ सभेत जमलेल्या जनसमुदायाला दाखवत आहेत. राज ठाकरे यांनी दाखवलेल्या व्हिडीओमध्ये देशातील पहिले डिजिटल गाव असा लौकिक असलेल्या हरिसाल गावचा व्हिडीओ ते सध्या प्रत्येक सभेत दाखवत आहेत. राज ठाकरे यांच्यामुळे हरिसाल गावची बदनामी झाली असल्याचा आरोप करत या गावचे उपसरपंच गणेश येवले यांनी राज ठाकरे यांना जशासतसे उत्तर दिले आहे.

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी हरिसाल गावाविषयी दाखवलेला व्हिडीओ पूर्णपणे खोटा असून, त्यांनी या माध्यमातून हरिसालची संपूर्ण देशात बदनामी केल्याचा आरोप उपसरपंच गणेश येवले यांनी फेसबूक लाईव्हच्या मध्यमातून केला आहे. राज ठाकरे हे त्यांच्या सभांमध्ये हरिसाल गावची बदनामी करत असून ते दाखवत असलेला व्हिडीओ खोटा असून असे करणे हे चूकीचे असल्याचे गणेश येवले यांनी फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून म्हटले आहे. जर गावामध्ये इंटरनेट नसते तर आज मी फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून तुमच्याशी संवाद साधू शकलो नसतो, असे त्यांनी यावेळी म्हटले.

डिजिटल व्हिलेजच्या माध्यमातून आमच्या गावात शाळेत कॉम्प्युटर लॅब देण्यात आली आहे. येथे एची, मायक्रोसॉफ्ट अशा कंपन्यांच्या मतदीने तंत्रज्ञान पोहोचले आहे. गावातील इंटरनेट व्यवस्थित काम करत आहे, असे ही त्यांनी यावेळी सांगितले. राज ठाकरे संपूर्ण महाराष्ट्रात हरिसालची बदनामी करत आहेत, त्यांनी केवळ राजकीय फायद्यासाठी हे केले असल्याचे गणेश येवले यांनी फेसबूक लाईव्हद्वारे सांगितले.

फेसबूक लाईव्हद्वारे राज ठाकरेंच्या आरोपांबाबत मत मांडताना हरिसाल गावचे उपसरपंच गणेश येवले यांनी यावेळी गावातील महिला, दुकानदार तसेच विद्यार्थ्यांशी संवाद साधत गावातील डिजिटल यंत्रणांची वस्तुस्थिती समोर मांडली. तसेच डिजिटल गावामध्ये ऑनलाइन पैसे ट्रांसफर करणे, ड्रायव्हिंग लायसेंससाठी तसेच आधार कार्ड साठी ऑनलाइन फॉर्म भरणे अशा सर्व गोष्टी हरिसाल गावात शक्य असल्याचे, फेसबूक लाईव्हवेळी दाखवून दिले.