राज ठाकरे हे शिवसेनेसारखे संधीसाधू नाहीत ; काँग्रेस नेत्याकडून राज ठाकरेंचं कौतुक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अजित पवारांनी मनसेला सोबत येण्यासाठी हात पुढे केला आहे. भाजपा विरोधात लढायचं असेल तर सेक्युलर विचार मानणाऱ्या सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे अशी भूमिका मांडताना अजित पवारांनी राज ठाकरेंचं कौतुक केलं आहे. अजित पवारांनंतर काँग्रेसचे नेते मिलिंद देवरा यांनीही राज ठाकरेंविषयी सकारात्मक विधान केले आहे. ‘राज ठाकरे हे शिवसेनेसारखे संधीसाधू नाहीत तसेच सेनेपेक्षा मनसे चांगली आहे’ अशा शब्दांत देवरा यांनी राज यांचं कौतुक केलं आहे. शिवसेनेनं आपल्या स्वार्थासाठी मोदींचा फायदा घेतला आणि सत्तेत बसली. आता मोदींची लोकप्रियता कमी झाली म्हणून मोदींवरच टीका करत आहे’, अशी टीकाही त्यांनी यावेळी शिवसेनेवर केली.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राज ठाकरेंविषयी मत व्यक्त करताना देवरा म्हणाले की, ‘अजित पवार काय म्हटले हे मला माहिती नाही, पण शिवसेनापेक्षा मनसे चांगली आहे. शिवसेना संधीसाधूपणा करणारी आहे. निवडणूक आधी मोदी याचं कौतुक करायचं आणि नंतर मात्र मोदींना नाव ठेवायचे काम सेना करते, अशी टीका देवरा यांनी केली.

यावेळी देवरा यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली. ते म्हणाले की,’मुख्यमंत्री फडणवीस सांगतात की, ‘मुंबईचा विकास आम्ही केला. पण खरा विकास आणि लोकांच्या समस्या काँग्रेसनेच सोडवल्या आहे. दक्षिण मुंबई जनतेला माझं आवाहन आहे की, तुमचा उमेदवार खरा काम कोण करतो, केवळ जुमल्यावर विश्वास ठेवू नका, काम पहा  मगच मतदान करा असंही आवाहनही त्यांनी केलं.