राज ठाकरे आज ईडीच्या चौकशीला सामोरे, अनेक पदाधिकाऱ्यांना घेतले पोलिसांनी ताब्यात

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना सक्तवसुली संचालनालयानं (ईडी) पाठवलेल्या नोटिशीवर आज ईडीकडून चौकशी होणार आहे. यासाठी मनसे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आक्रमक झाले असून आज कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुंबई पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांना नोटिसा पाठवल्या असून पदाधिकाऱ्यांची धरपकड देखील सुरु केली आहे.

या चौकशीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी दादर तसेच राज ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या कृष्णकुंजच्या बाहेर मोठा फौजफाटा तैनात केला असून कार्यकर्त्यांनी कोणत्याही प्रकारचा राडा घालू नये यासाठी खबरदारी घेतली आहे.

याआधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. त्याचबरोबर सर्वसामान्य नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही तसेच सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन देखील त्यांनी केले होते. त्याचबरोबर कुणीही ईडीच्या कार्यालयाजवळ येऊ नये, असेदेखील आदेश त्यांनी दिले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आज पोलिसांनी अनेक पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले असून सचिव संदीप देशपांडे तसेच मनसेचे ठाणे शहर अध्यक्ष रवी मोरे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून कार्यकर्ते काय भूमिका घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, राज ठाकरे यांना ईडीने नोटीस पाठवल्यानंतर मनसेचा कार्यकर्ता प्रवीण चौगुले याने मंगळवारी स्वतःला जाळून घेत आत्महत्या केली आहे. राज ठाकरे यांच्या नोटिशीमुळे तणावाखाली येत त्याने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली होती.