राज ठाकरेंचे ‘या’ जागांवर विशेष लक्ष्य

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभेच्या रिंगणातून जरी माघार घेतली असली तरी त्यांचे लक्ष्य विधानसभा असल्याचे बोलले जात आहे. त्यासाठी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मुंबई, पुणे, नाशिक या पट्ट्यात राज यांनी लक्ष्य केंद्रित केले आहे .विधानसभेत राज यांना सोबत घेऊन निवडणुकांना सामोरे जाण्याचे संकेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिले आहेत. त्यामुळे लोकसभेच्या निकालानंतर विधानसभेसाठी राज्यात नवीन राजकीय समीकरणे दिसतील, असे बोलले जात आहे.

राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्याविरोधात राज्यभरात जाहीर सभांचा धडाका लावून भाजपला धडकी भरवली असतानाच राज यांच्या सभांचा दुसरा टप्पा सुरू होत आहे. दुसऱ्या टप्प्यातील पहिली सभा उद्या मुंबईत अभ्युदयनगर-काळाचौकी येथील शहीद भगतसिंग मैदानावर होणार आहे. दुसरी सभा बुधवार, २४ एप्रिल रोजी भांडुपला आहे. तिसरी सभा कामोठे येथे गुरुवार, २५ एप्रिल रोजी तर चौथी सभा शुक्रवार, २६ एप्रिल रोजी नाशिकमध्ये होणार आहे.

राज ठाकरे यांचा पक्ष लोकसभेच्या मैदानात उतरला नाही मात्र राज ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला पाठिंबा जाहीर केला आहे. तसेच राज्यभरात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा प्रचार करण्यासाठी राज ठाकरे प्रचारसभा घेत आहेत. ज्या ठिकाणी आम्हाला मतं चांगली मिळाली होती, आमचे आमदार होते, त्या ठिकाणीच आम्ही सभा घेतल्या आहेत, असे मनसेकडून सांगितले जात असले, तरी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मुंबई, पुणे, नाशिक या पट्ट्यात राज यांनी मोर्चा वळवला आहे.