#loksabha : ‘निवडणूक भारताची आहे की नेपाळची ?’ : राज ठाकरेंनी उडवली मोदींच्या कॅम्पेनची खिल्ली

'मै भी चौकीदार' कॅम्पेनवरून मोदींवर साधला निशाणा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – निवडणूक भारताची आहे की नेपाळची ? असा सवाल उपस्थित करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सत्ताधारी मोदी सरकार आणि भाजपावर सडकून टीका केली आहे. भाजपाने सुरु केलेल्या ‘मै भी चौकीदार’ या कॅम्पेनची खिल्ली उडवत राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. इतकेच नाही तर, भारतीय हवाई दलाने केलेल्या एअर स्ट्राईकबाबत धादांत खोटी माहिती पसरवली जात आहे असा आरोपही राज यांनी यावेळी केला आहे.

आगामी लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यापासून प्रत्येक पक्ष आपापल्या तयारीला लागला आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. दरम्यान, आगामी लोकसभा निवडणूक लढणार की नाही याबाबत मनसेने सस्पेन्स कायम ठेवला होता. परंतु राज ठाकरे यांनी आज कार्यकर्त्यांना आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात कामाला लागा, असा आदेश दिला आहे.

यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर ‘मै भी चौकीदार’ या कॅम्पेनवरून निशाणा साधला आहे. यावेळी राज ठाकरे म्हणाले की, “पंतप्रधानांचे स्वप्न कशी मोठी हवीत. यांची स्वप्न काय आहेत तर चौकीदार होण्याची. मी कोण आहे असं विचारलं तर हे म्हणतात चौकीदार. निवडणूक भारताची आहे की नेपाळची ?” असा सवाल राज ठाकरे यांनी केला आहे.

‘त्यांनी तुमच्यासमोर थैल्या रिकाम्या केल्या तर ते घ्या’

यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, “भाजपचे लोक तुमच्याकडे येतील, त्यांनी तुमच्यासमोर थैल्या रिकाम्या केल्या तर ते घ्या. त्यांनी देशाला गेली पाच वर्षे लुटले आहे. त्यामुळे तुम्ही त्यांना लुटले तर काही हरकत नाही”

You might also like