राज ठाकरेंमुळे ‘त्यांना’ मिळाला दिलासा !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – ऐरोली येथे स्थलांतर नको, यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांना साकडे घालणाऱ्या कोळी बांधवाना आता दिलासा मिळणार आहे. छत्रपती महात्मा फुले मंडईमध्येच या कोळी बांधवाना पूर्वीप्रमाणे व्यवसाय करता येणार आहे. मात्र मंडईची डागडुजी होईपर्यंत त्यांचे मुंबईतच स्थलांतर केले जाणार असल्याची ग्वाही मुंबई पालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांनी राज ठाकरे यांना दिली आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी कोळी बांधवांना पाठींबा देत त्यांचा प्रश्न आयुक्तांसमोर मांडला. त्यावेळी आयुक्त परदेशी यांनी मंडईची डागडुजी होईपर्यंत या कोळी बांधवांचे पुर्नवसन याच मुंबई परिसरात करण्यात येईल. त्यांचे मुंबईबाहेर स्थलांतर करण्यात येणार नाही. तसेच डागडुजी झाल्यावर त्याच मंडईत कोळी बांधवांचे पुर्नवसन करणार असल्याचे आश्वासन राज ठाकरे यांना दिले.

आठवड्याभरापूर्वी छत्रपती महात्मा फुले मंडईतील कोळी बांधवांनी ऐरोली येथील स्थलांतराला विरोध करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. तेव्हा राज ठाकरेंनी कोळी बांधवांना पाठींबा देत आपण हा प्रश्न पालिका आयुक्तांसमोर मांडू, असे आश्वासन दिले होते. या विषयावर आयुक्तांसोबत बोलण्यासाठी व नवनियुक्तीनंतर त्यांना शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे पालिका मुख्यालयात आले होते.

आरोग्यविषयक वृत्त