ठाकरेंच्या भाषणातला ‘पोपट’ पाकिस्तानचा तर नाही ना ? : विनोद तावडेंचा हल्लाबोल 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेला शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. राज ठाकरेंच्या भाषणातला ‘पोपट’ पाकिस्तानचा तर नाही ना ? असा प्रश्न विचारात तावडे यांनी राज ठाकरेंवर पलटवार केला आहे. राज ठाकरे पाकिस्तानचे हिरो बनू पाहताहेत, अशा शब्दात तावडे यांनी ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे.

यावेळी बोलताना तावडे म्हणाले की, “रंगशारदा सभागृहात नेहमी अनेक नाटकं होतात. आज तिथे अजून एक नाटक पाहायला मिळाले. दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते तसा ‘बारामतीचा पोपट’ या मुद्द्याला पुन्हा एकदा अधोरेखित करणारे आजचे भाषण होते. तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही पक्षांचा पाठिंबा घेऊन कोणतीही एक लोकसभा निवडणूक लढवा आणि डिपॉझीट वाचवून दाखवा” असे आव्हान तावडे यांनी राज ठाकरेंना दिले आहे.

मुंबईतल्या रंगशारदा सभागृहामध्ये मंगळवारी झालेल्या मनसे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका करताना ‘पोपट’ या शब्दाचा वापर केला होता. परंतु पोपट शब्दाच्या वापरावरुन तावडेंनी राज ठाकरेंना सडेतोड उत्तर दिले आहे. “पोपटाचा रंग हिरवा असतो तो पाकिस्तानचा तर नाही ना?” असा उपरोधिक सवाल तावडेंनी उपस्थित केला आहे.

नक्की काय म्हणाले होते राज ठाकरे

मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरे यांना ‘बारामतीचा पोपट’ असं संबोधलं होतं. या टीकेचा राज ठाकरेंकडून खरपूस समाचार घेण्यात आला. देवेंद्र फडणवीस म्हणजे हवा गेलेला फुगा असल्याची बोचरी टीकाही राज यांनी केली होती.

‘चौकीदार चोर’कडे दुर्लक्ष करा

भाजपकडून चौकीदारचं कॅम्पेन सुरु आहे, त्यामुळे निवडणूक भारताची आहे की नेपाळची? हेच कळत नाही, अशा शब्दात राज ठाकरेंनी भाजपची खिल्ली उडवली. या चौकीदारच्या भानगडीत पडू नका. तुम्ही प्रश्न विचारु नयेत म्हणून ही गिमिक आहेत. हे कॅम्पेन म्हणजे तुमचं लक्ष हटवण्यासाठी फार्स आहे, ट्रॅप आहे, याकडे लक्ष देऊ नका, असं आवाहन राज ठाकरेंनी केलं.

भाजपची लोकं तुमच्याकडे येतील, त्यांनी तुमच्यासमोर थैल्या रिकाम्या केल्या तर घ्या, त्यांनी देश लुटलाय, तुम्ही त्यांना लुटलं तर हरकत नाही, असा सल्लाही राज ठाकरेंनी दिला.

एअर स्ट्राईकबाबत धादांत खोटी माहिती पसरवली जात आहे, खोट्या फोटोंच्या आधारे खोटा प्रचार केला जात आहे. माणूस बदलला म्हणून माझं मतही बदललं, असं स्पष्टीकरण राज ठाकरेंनी दिलं.