राज्यातील आघाडीबद्दल मनसेची भूमिका काय ? नांदगावकरांनी दिलं ‘हे’ उत्तर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील निवडणूक संपल्यानंतर राज ठाकरे आम्हाला भेटले होते. त्यानंतर आम्ही आज सरचिटणीस आणि नेत्यांची बैठक घेतली. निवडणुकीत काय झालं, पुढील महापालिका निवडणुकीत काय भूमिका असणार ? यावर चर्चा झाली. असे म्हणत मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी आज (मंगळवार) झालेल्या पक्षाच्या बैठकीविषयी माहिती दिली. तसेच राज्यातील ऐतिहासिक महाआघाडीबाबत भाष्य केले आहे.

बाळा नांदगावकर म्हणाले, महाविकास आघाडीबाबत आम्ही सद्यस्थितीत तटस्थ भूमिकेत पाहात आहोत. राजकारणात आज जो सावळा गोंधळ सुरू आहे त्याविषयी लोकांमध्ये नेमकं काय मतामतांतर आहेत, हे पाहून त्यादृष्टीने पुढे आपल्याला काय करायला हवं ? या बैठकीत आढावा आम्ही घेतला. लोकांनी आपल्याला एवढी मते दिल्यानंतर पुढची भूमिका काय घ्यायची याबाबत निर्णय घेणार आहोत. महाविकास आघाडीबाबत भविष्यात काय भूमिका घ्यायची, हे राज ठाकरे सविस्तरपणे विचार मांडतील, असे नांदगावकर म्हणाले.

जे काही झालं ते फार काही लोकांना आवडलेलं नाही. विचारधारा सोडून दुसरीकडे वळतोय हे आवडलेलं नाही. लोकोपयोगी आणि समाज मनाला पटेल अशी भूमिका मनसे लवकरच मांडेल, अशी माहिती नांदगावकर यांनी दिली. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात स्थापन झालेल्या नव्या सरकारबद्दल राज ठाकरे काय भूमिका घेतात हे पाहणे औत्सुक्याचं आहे. केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपचे सरकार आहे, तर राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचं सरकार आहे. त्यामुळे राज ठाकरे जनतेची प्रश्न घेऊन राज्य आणि केंद्र या दोन्ही सरकारला एकाच वेळी लक्ष्य करण्याची शक्यता आहे.

Visit : Policenama.com