राज ठाकरे उत्तर भारतीयांच्या कार्यक्रमात होणार सहभागी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – उत्तर भारतीयांच्या मुद्द्दयावरुन कायम आक्रमक भूमिका घेणारे व उत्तर भारतीयांमुळे मुंबईची वाट लागल्याची भूमिका मांडणारे महाराष्ट्र नवनिर्माण संघटनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे आता चक्क उत्तर भारतीयांच्या एका कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम येत्या २ डिसेंबरला कांदिवलीत होणार आहे.

कांदिवलीत उत्तर भारतीय महापंचायत संघाने येत्या २ डिसेंबरला हा कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमाचे निमंत्रण राज ठाकरे यांना १२ आॅक्टोबरला देण्यात आले होते. हे निमंत्रण राज ठाकरे यांनी स्वीकारले आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली. कांदिवलीतील कार्यक्रमात राज ठाकरे उत्तर भारतीयांशी संवाद साधणार आहेत. उत्तर भारतीयांबद्दल असलेले त्यांचे मत यावेळी ते मांडणार आहेत. यामुळे या कार्यक्रमात राज ठाकरे या भूमिका मांडतात याची उत्सुकता आहे.

उद्धव ठाकरे यांनी मी मुंबईकर असा उपक्रम सुरु केला होता. त्यात महाराष्ट्राव्यतिरिक्त अन्य राज्यातून आलेल्या परप्रांतीयांना शिवसेनेत सामावून घेण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु केले होते. त्यावेळी राज ठाकरे हे युवा शिवसेनेचे अध्यक्ष होते. रेल्वेच्या परिक्षेसाठी आलेल्या उत्तर भारतीयांना कल्याण रेल्वे स्टेशनवर शिवसेनेच्या युवा सेनेने त्यांच्यावर हल्ला चढवला होता. त्यातून राज ठाकरे यांची उत्तर भारतीयांविरोधी नेता अशी प्रतिमा सर्वप्रथम तयार झाली. शिवसेनेतून फुटून बाहेर पडल्यानंतर त्यांनी मनसेची स्थापना केली. उत्तर भारतीयांविरोधी पक्ष म्हणून मनसेला देशातील अन्य राज्यात ओळखले जाते.

ज्या राज्यात आपण राहतो, त्या राज्याशी प्रामणिक रहा, अशी भूमिका राज ठाकरे कायम मांडत राहिले आहे. कर्नाटकामधील सीमा वासियांनाही त्यांनी आपले हे मत स्पष्टपणे व्यक्त केले होते. या पार्श्वभूमीवर आपली व आपल्या पक्षाची उत्तर भारतीयविरोधी ही प्रतिमा बदलण्यासाठी राज ठाकरे कसा उपयोग करुन घेतात व ते या कार्यक्रमात काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.