‘औरंगाबाद’ चं नाव ‘संभाजीनगर’ करण्यासाठी राज ठाकरे पुढाकार घेतील, मनसेत नुकताच प्रवेश केलेल्या नेत्यानं सांगितलं

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – मागील अनेक वर्षांपासून औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर करण्याची मागणी होत आहे. परंतु कोणतेही सरकार आले तरी या मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते. आता मात्र राज ठाकरे यांनी पुढाकार घेऊन हा प्रश्न निकाली काढावा, यासाठी ते नक्कीच पुढाकार घेतील अशी अपेक्षा नुकतेच मनसेत प्रवेश केलेल्या हर्षवर्धन जाधव यांनी व्यक्त केली.

औरंगाबाद, उस्मानाबाद शहरांच्या नामांतराची चर्चा महाराष्ट्रात गेल्या 20 वर्षांपासून सुरु आहे. 1995 मध्ये औरंगाबाद महापालिकेच्या सभेत औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याचा ठराव बहुमताने मंजूर केला होता. हा ठराव राज्य सरकारकडे पाठवण्यात आला आहे.

1995 साली युतीचे सरकार होते. औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे हे त्यावेळी औरंगाबादचे तर हरिभाऊ बागडे हे जालना जिल्ह्याचे पालकमंत्री होते. मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यांनी नामांतराचा प्रस्ताव मांडला होता. त्याला मंजुरी मिळाली होती. मात्र त्याची अद्यापही अंमलबजावणी झाली नसल्याचे हर्षवर्धन जाधव म्हणाले.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्यापासून दोन दिवसांच्या औरंगाबाद दौऱ्यावर असणार आहेत. याबाबत मी त्यांच्याशी चर्चा करुन त्यांना याबाबतची सविस्तर माहिती देईल असेही हर्षवर्धन जाधव म्हणाले.