पुण्यात ‘या’ तारखेला होणार ‘राज’गर्जना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा तसेच भाजप सरकारच्या कारभाराचा पर्दाफाश करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे हे दि. १८ एप्रिल रोजी पुण्यात जाहिर सभा घेणार आहेत. त्याबाबतची माहिती मनसेचे शहराध्यक्ष अजय शिंदे यांनी दिली आहे.

मनसेकडून गुढीपाडव्यानिमित्‍त आयोजित करण्यात आलेल्या मुंबई येथील मेळाव्यात राज ठाकरे यांनी सत्‍ताधारी भाजप सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्यावर कडवी टीका केली होती. सत्‍ताधारी भाजप सरकारच्या कारभाराचा पर्दाफाश करण्यासाठी आपण महाराष्ट्रात जाहिर सभा घेणार असल्याचे देखील त्यावेळी जाहिर करण्यात आले होते. लोकसभा निवडणुका न लढविण्याचा निर्णय मनसेने यापुर्वीच घेतला आहे. भाजप-शिवसेना महायुतीच्या उमेदवारांना पाडा असेही मनसे अध्यक्षांनी सांगितले होते. त्यानुसारच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे दि. १८ एप्रिल रोजी सिंहगड रस्त्यावर मुठा कालव्याजवळ संध्याकाळी ७ वाजता जाहिर सभा घेणार आहेत. राज ठाकरे यांच्या जाहिर सभांमुळे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीला फायदा होईल अशी सर्वत्र चर्चा आहे. मात्र, राज ठाकरे यांच्या सभेचा नेमका किती फायदा आघाडीला होईल हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. पुण्यात होणार्‍या सभेत राज ठाकरे हे काय बोलणार याकडे सर्व पुणेकरांचे लक्ष लागले आहे.