2 वर्षापुर्वीचं राज ठाकरेंचं ‘ते’ व्यंगचित्र होतंय ‘व्हायरल’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मिडियावरुन संन्यास घेण्याचा विचार व्यक्त केल्यानंतर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दोन वर्षापूर्वी काढलेले जुने व्यंगचित्र पुन्हा एकदा सर्वांसमोर आले असून ते आता तुफान व्हायरल होऊ लागले आहे.

राज ठाकरे यांनी हे व्यंगचित्र ९ ऑक्टोंबर २०१७ रोजी काढले होते. या व्यंगचित्रातून राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला होता. भाजपचे सर्वात मोठे अस्त्र म्हणून ओळखले जाणारे सोशल मिडिया हे अस्त्रच बुमरँगसारखे त्यांच्यावर पुन्हा उलटून येत असल्याचे दाखविणारे व्यंगचित्र राज ठाकरे यांनी काढले होते. देशात ऑक्टोंबरमध्ये परतीचा पाऊस सुरु असतो, त्यामुळे त्या काळात काढलेल्या या व्यंगचित्राला राज ठाकरे यांनी समर्पक असे परतीचा पाऊस असे शिर्षक दिले होते. या व्यंगचित्रात अमित शहा हे आपल्याला काही ऐकू येत नाही तर मोदी हे आपल्याला काही दिसत नसल्याचे दाखवत आहे. अरुण जेटली हे डोक्याला हात लावून बसल्याचे दाखविण्यात आले होते.

सध्या हे व्यंगचित्र सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. दोन वर्षापूर्वी राज ठाकरे यांनी व्यक्त केलेले भाकित सध्या सोशल मिडियाबाबत खरे होताना दिसत आहे.