राज ठाकरे यांची अवस्था ‘मान ना मान मै तेरा मेहमान’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राज ठाकरे आमच्या विरोधात प्रचार करणार असले किंवा सभा घेणार असले तरी त्यांची अवस्था ही दुर्दैवी आहे. राज ठाकरे यांची अवस्था सध्या मान ना मान मै तेरा मैहमान अशी झाली आहे अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. त्यांच्यासोबत गेलेले मनाने हिंदुत्त्वादी असेही ते म्हणाले. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

मुलाखतीत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, “राज ठाकरे हे एक मोठं नेतृत्त्व होईल वाटल्याने अनेक लोक त्यांच्यासोबत गेले परंतु फार राहिले नाही. राज ठाकरेंनी कितीही सभा घेतल्या तरी त्यांचा मतदार, म्हणजेच मनसेचा जो काही उरलासुरला मतदार असेल हा मतदार त्यांच्यापासून तुटेल. राज ठाकरे जेवढ्या ताकदीने भाजपा आणि सेनेविरोधात बोलतील तेवढ्या ताकदीने त्यांचा मतदार भाजपा सेनेकडे वळेल असं मला वाटतं. त्यांच्या मतदारांना मोदी हवे आहेत.

राज ठाकरेंची अवस्था मान ना मान मै तेरा मेहमान

पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, “आमच्यासाठी सर्वात मोठा फायदा हा आहे की काँग्रेस पक्ष यामुळे उघडा पडला. काँग्रेस राष्ट्रवादीने मनसेला आघाडीत घेतलं नाही. का घेतलं नाही? कारण आघाडीत घेतलं तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी, बिहार उत्तर प्रदेशमध्ये काय उत्तर देणार? राज ठाकरेंची अवस्था मान ना मान मै तेरा मेहमान अशी झाली आहे याचं मला दुर्दैव वाटतं असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

‘त्यामुळे ते स्वतःचं महत्त्व कमी करून घेत आहेत’

याशिवाय बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, “एक तरुण नेता अशी राज ठाकरे यांची ओळख आहे. परंतु आता ते जे काही करत आहेत त्यामुळे स्वत:चे महत्त्व कमी करून घेत आहेत. लोकांना त्यांचं भाषण आवडतं म्हणून लोक त्यांच्या सभांना गर्दी करतात परंतु त्यांच्या सभांचा काही परिणाम होत नाही. राज ठाकरे माझे चांगले मित्र आहेत फार टीका मी करणार नाही पण त्यांची अवस्था दुर्दैवी आहे” असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.