पुण्यातून राज ठाकरेंची ‘तोफ’ धडाडणार, राज्यात 15 सभा

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या जाहीर सभा हा नेहमीच चर्चेचा विषय होत असतो. विधानसभेसाठी त्यांच्या प्रचार दौऱ्याची सुरुवात पुण्यातून होणार आहे. ते संपूर्ण महाराष्ट्रात १५ सभा घेणार आहेत. लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांच्या सभा गाजल्या त्या ‘लाव रे तो व्हिडिओ’या नाविन्यपूर्ण पद्धतीमुळे त्याचा मोठा फटका सत्ताधाऱ्यांना बसू शकला असता. पण मनसेचे उमेदवार लोकसभेला रिंगणात नव्हते. त्याचवेळी नरेंद्र मोदी यांनी सर्व निवडणुक बालाकोट एअर स्ट्राईक व पाकिस्तान याभोवती केंद्रीत केल्याने मतदारांनी त्यावरच मतदान केले.

राज ठाकरे यांनी शेवटच्या क्षणी विधानसभा निवडणुका लढविण्याचे ठरविले आहे. आता त्यांची पहिली सभा ९ ऑक्टोंबरला पुण्यात होणार आहे. महसुल मंत्री चंद्रकांत पाटील हे कोथरुडमधून निवडणुक लढवत आहेत. कोल्हापूरहून पाटील सुरक्षित मतदार संघ शोधत पुण्यात आले असून त्यांना येथे विरोध होत आहे. त्यांच्याविरुद्ध मनसेचे किशोर शिंदे उभे आहेत.

त्यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पाठिंबा दिला आहे. त्यामुळे कोथरुड हा राज्यात सर्वात चर्चेचा मतदारसंघ झाला आहे. मनसेची भाजपाशी या मतदारसंघात थेट लढत होत असल्याने पुण्यातूनच राज ठाकरे यांनी आपल्या प्रचाराचा शुभारंभ करण्याचे ठरविले आहे. लोकसभेतील लाव रे व्हिडिओ प्रमाणे या विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे नेमके काय करणार याविषयी उत्सुकता आतापासूनच निर्माण झाली आहे.