राज ठाकरेंची तोफ आज शिवाजी पार्कवर गरजणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने लोकसभा निवडणुक लढविणार नसल्याचे जाहीर केले. तसेच भाजप, मोदी, शहा यांचा पराभव करण्यासाठी काम करण्याचे आवाहन मनसे कार्यकर्त्याना केले आहे. त्यामुळे आता आज शिवाजी पार्कवर राज ठाकरे त्याच्या पुढे काय पावले उचलणार याविषयी मनसेबरोबरच इतरांना उत्सुकता निर्माण झाली आहे.

मनसेच्या वर्धापन दिन मेळाव्यात आणि त्यानंतर झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर जोरदार टिका केली होती. देशाला वाचवायचे असेल तर या मोदी -शहा जोडीला राजकीय पटलावरुन बाजूला सारले पाहिजे, असा प्रहार ठाकरे यांनी केला होता.

त्यानंतर अनेक ठिकाणी मनसे कार्यकर्ते काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारात दिसून येऊ लागले आहेत. तर अनेकांनी या उमेदवारांना पाठिंबा दिला आहे. राज चा करिष्मा कमी झाला असला तरी मनसेची प्रत्येक ठिकाणी स्वत:ची अशी कमी जास्त व्होट बँक आहे. ती महाआघाडीच्या पारड्यात पडली तर त्याचा भाजपबरोबरच्या लढतीत आणखी रंगत येणार आहे. त्यामुळे आज राज ठाकरे त्याच्या पुढे जाऊन काय पाऊल टाकणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.