साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर प्रकरणी मनसेची आहे ‘ही’ पहिली प्रतिक्रिया

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपाच्या उमेदवार आणि मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी मुंबई दहशतवादी हल्ल्यातील शहीद हेमंत करकरे यांच्याबाबत वादग्रस्त विधान केलं आहे. करकरे यांच्या बद्दल केलेल्या वादग्रस्त विधानावरून राजकारण चांगलेच तापले आहे. ‘मी ज्या दिवशी तुरूंगात गेले त्या दिवशी सुतक सुरू झाले आणि ज्या दिवशी हेमंत करकरे यांना दहशतवाद्यांनी मारले, त्या दिवशी माझे सुतक संपले’ असे वादग्रस्त विधान साध्वी प्रज्ञा सिंह यांनी केले होते. यावर मनसेने टीका केली आहे, ‘मोदी शहाची टोळी हरेल तेव्हा आमचे सुतक सुटेल’ असे ट्विट मनसेचे प्रवक्ता अमेय खोपकर यांनी केले आहे.

साध्वी यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा समाचार घेताना खोपकर यांनी एक ट्विट केले आहे. यामध्ये त्यांनी ‘मुक्तफळं म्हणावं की गटारगंगा ? हा प्रश्न पडलाय. स्वत:ला साध्वी म्हणवणाऱ्या भोपाळच्या उमेदवारामुळे आमच्या करकरे साहेबांविषयी नको ते बरळून या कथित साध्वीने भाजपाची देशभक्ती नक्की कशी असते हे दाखवून दिलंय. याचा नुसता निषेध करून भागणार नाही, जेव्हा ही मोदी-शहांची टोळी निवडणूक हरेल तेव्हाच आता आमच सुतक संपेल.’ असे म्हटले आहे.

आज राज ठाकरे यांची रायगडमध्ये सभा होणार आहे. या सभेत राज ठाकरे साध्वी यांच्या वक्तव्याचा कसा समाचार घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

काय म्हणाल्या साध्वी प्रज्ञा

गुरूवारी एका कार्यक्रमात बोलताना साध्वी प्रज्ञा यांनी दिवंगत एटीएस प्रमुख हेमंत करकरे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. करकरे यांनी मला खोट्या गुन्ह्यात अडकवल्याचा आरोप त्यांनी केला. तो तपास अधिकारी सुरक्षा आयोगाचा सदस्य होता. त्याने हेमंत करकरे यांना बोलावले आणि सांगितले की पुरावे नसतानाही साध्वीला तुरूंगात का डांबले. यावर हेमंत करकरे यांनी सांगितले की मी काहीही करेन पण साध्वीविरोधात पुरावे सादर करणारच, मी साध्वीला सोडणार नाही असा आरोप साध्वी प्रज्ञाने केला.

हेमंत करकरे याने हा देशद्रोह केला होता. तो मला विचारायचा की खरं जाणून घेण्यासाठी मला देवाकडे जावं लागेल का. मी करकरे यांना सांगितले की तुमचा सर्वनाश होईल. त्याने मला शिवीगाळ केली होती. ज्या दिवशी मी तुरूंगात गेले त्या दिवशी सुतक सुरू झाले आणि ज्या दिवशी दहशतवाद्यांनी करकरे यांना मारले त्या दिवशी सुतक संपले असे वादग्रस्त विधान साध्वीने केले होते.