‘या’ राजानं जीपनं तोडलं होतं मुख्यमंत्र्याचं हेलिकॉप्टर, नंतर झाला फेक एन्काउंटर !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राजा मानसिंग हत्येत सहभागी 14 आरोपींपैकी 11 आरोपींना दोषी ठरविण्यात आले आहे. मात्र, या प्रकरणातील तीन आरोपींना निर्दोष सोडण्यात आले. या सर्व 11 दोषींना शिक्षा देण्याचा निकाल बुधवारी सुनावण्यात येणार आहे. राजा मानसिंग यांची मुलगी दीपा सिंग, तिचा नवरा विजयसिंह राजस्थानमधील प्रसिद्ध-35 वर्षांच्या खटल्याच्या सुनावणीसाठी मथुरा कोर्टात दाखल झाले होते. 21 फेब्रुवारी 1985 रोजी भरतपूरचे राजा मानसिंग आणि इतर दोन जणांची भरतपूर पोलिसांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. या प्रकरणात तत्कालीन सीओ कानसिंग भाटी, एसएचओ वीरेंद्र सिंग आणि इतरांची नावे देण्यात आली होती. पोलिसांनी चकमकीचा अहवाल दाखल केला होता. परंतु सीबीआयने जयपूर कोर्टात याप्रकरणाची आरोपपत्र दाखल केल्यावर या घटनेची सीबीआय चौकशी झाली. यानंतर मथुरा कोर्टात 1990 पासून या खटल्याची सुनावणी सुरू आहे.

राजा मान सिंह यांनी राजस्थानचे तत्कालीन मुख्यमंत्री शिवचरण माथूर यांचे हेलिकॉप्टर जीपने तोडले होते. निवडणुकीच्या दरम्यान मंचही तोडला होता. याप्रकरणी पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आली होती. त्यानंतर 21 फेब्रुवारी 1985 रोजी डीग विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार राजा मानसिंग आपली जीप घेऊन लाल कुंडाच्या निवडणूक कार्यालयातून डीग पोलिस ठाण्यासमोरून निवडणूक प्रचारासाठी निघाले होते. त्यावेळी पोलिसांनी त्यांना घेरले आणि गोळीबार केला, त्यात राजा मान सिंह यांच्याखेरीज सुमेरसिंग आणि हरी सिंग हे ठार झाले. या घटनेनंतर डीग पोलिस स्टेशनचे एसएसओ वीरेंद्र सिंग यांनी राजा मान सिंह यांचा जावई विजयसिंग सिरोही याच्याविरूद्ध कलम 307 चा गुन्हा दाखल केला. त्याच दिवशी विजयसिंह यांना जामीन मिळाला आणि 22 फेब्रुवारीला राजा मान सिंह यांना राजवाड्यात अंत्यसंस्कार करण्यात आले.

यानंतर 23 फेब्रुवारी रोजी विजय सिंगने राजा मान सिंह आणि अन्य दोघांच्या हत्येचा गुन्हा डीग पोलिस ठाण्यात दाखल केला. यामध्ये सीओ कानसिंग भाटी, एसएचओ वीरेंद्र सिंग यांच्यासह 14 पोलिसांवर आरोपी होते. हे हाय-प्रोफाइल प्रकरण सीबीआयकडे तपासासाठी देण्यात आले. सुप्रीम कोर्टाने राजस्थानच्या बाहेर मथुरा कोर्टात या खटल्याची सुनावणी करण्याचे आदेश दिले होते. तेव्हापासून आतापर्यंत 78 वेळा या प्रकरणात साक्ष दिली गेली आहे आणि आता शेवटी या प्रकरणात निकाल येणार आहे. दरम्यान, आतापर्यंत तीन आरोपींचा मृत्यू झाला असून बहुतेकांचे वय 80 होते.