राष्ट्रवादीला दौंडमधून अखेर धक्का ! CM फडणवीस, आ. कुल यांच्या उपस्थितीत राजाभाऊ तांबेंचा भाजप प्रवेश

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन (अब्बास शेख) – दौंड तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला सध्या धक्क्यावर धक्के बसत असून आज गुरुवारी अखेर दौंड राष्ट्रवादीचे नेते राजाभाऊ तांबे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत दादा पाटील व दौंडचे आमदार राहुल कुल यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. याबाबत खुद्द राजाभाऊ तांबे यांनी बोलताना, ‘मी मनसे मधून राष्ट्रवादी कॉंग्रेस मध्ये प्रवेश केला, मागील चार वर्षे राष्ट्रवादी कॉंग्रेसने माझ्या बरोबर माझ्या सोबतच्या सर्व कार्यकर्त्यांवर अन्याय केला. कोणत्याही प्रकारचा न्याय राष्ट्रवादी कॉंग्रेसने मागील चार वर्षांत आम्हाला दिला नाही.’ हे सांगतानाच मागील पाच वर्षांमध्ये तालुक्याचे आमदार राहुलदादा कुल यांनी जे भरीव काम या तालुक्यात केले आहे त्याचा विचार करून मी व माझ्या कार्यकर्त्यांनी राहुलदादा कुल यांचे बरोबर जाण्याचा निर्णय घेतलेला आहे.

मा. राहुलदादांनी मागच्या पाच वर्षांमध्ये तालुक्यातील सर्व समाजबांधवांना बरोबर घेऊन जाण्याचे काम केलेलं आहे. तालुक्यामध्ये चांगले सामाजिक वातावरण त्या निमित्ताने निर्माण झाले आहे. मराठा आरक्षणासारखा मोठा विषय मार्गी लागला, धनगर समाजाला आदिवासी बांधवांच्या योजना लागू करण्यात आल्या. १००० कोटींची तरतूद शासनाने धनगर समाजाच्या उन्नतीसाठी केली. ओबीसी समाजासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन केले. तालुक्यातील मुस्लीम व ख्रिश्चन समाजाला मोठ्या प्रमाणावर अल्पसंख्याक निधी देण्यात आला, बौद्ध समाजासाठी बुद्धविहारचे बांधकाम करण्याचे कामाचे भूमिपूजन नुकतेच करण्यात आले आहे. मागासवर्गीय निवासी शाळा देखील लवकरच सुरु होत आहे. दौंड शहराचे स्वरूप बदलण्यासाठी आमदार राहुल दादा कुल यांनी चांगल्या प्रकारे काम केले आहे. दौंड तालुक्याला बऱ्याच कालखंडा नंतर एवढा मोठ्या प्रमाणवर निधी मिळालेला आहे.

याचा विचार करून भविष्यात देखील मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे नेतृत्वाखालील सरकार हेच दौंड तालुक्याला न्याय मिळवून देऊ शकते. या तालुक्याचे आमदार मा. राहुलदादा कुल हेच या तालुक्याला न्याय देऊ शकतात असा ठाम विश्वास मला असल्यामुळे मी माझ्या सर्व कार्यकर्त्यांनी पुढील राजकीय प्रवास त्यांच्या बरोबर करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आमचा सर्वांचा उद्देश हा दौंड तालुक्याचे हित जोपासणे व विकास साधने हेच आहे. यासाठी आम्ही सर्वांनी एकत्र काम करून राहुलदादा कुल यांना पुन्हा एकदा विजयी करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करणार आहोत असे त्यांनी सांगितले.

Visit : Policenama.com