पक्षाचा AB फॉर्म मिळूनही पार्किंगला जागा न मिळाल्याने ‘त्यांची’ आमदारकीची हुकली संधी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – आतापर्यंत काही नेत्यांना पक्षाने तिकीट न दिल्याने उमेदवारी अर्ज दाखल करता आला नाही. मात्र रिपाईचे आणि आंबेडकर राईट्स पार्टी ऑफ इंडिया या पक्षांच्या उमेदवारांकडे पक्षाने दिलेला एबी फाॅर्म असूनही पार्किंगला लवकर जागा न मिळाल्याने उशीर झाला म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करता आला नाही.

महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक 21 ऑक्टोबरला होणार असून त्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अखेरची तारीख आज आहे. रिपाईचे (कांबळे गट) राजन कांबळे आणि आंबेडकर राईट्स पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचे उमेदवार हनुमंत नलावडे यांना पक्षाने एबी फाॅर्म पण दिला, पण निवडणूक कार्यालयाजवळ गाडी लावायला पार्किंग लवकर न मिळाल्याने पाच मिनीट उशीर झाला त्यामुळे त्यांनी विधानसभा निवडणूक लढण्याची संधीच गमावली.

नलावडे हे तीन वाजून तीन मिनीटांनी घोले रस्त्यावरील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाच्या गेटवर पोहचले मात्र पोलिसांनी त्यांना अडवत पुढे जाता येणार नाही असे सांगितले. यावरून नलावडे व पोलिसांंमध्ये वाद झाला. अर्ज भरण्याची वेळ निघून गेल्याने नलावडे यांना माघार घ्यावी लागली.
नातेवाईकांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी गेलो असल्याने मला उशीर झाला. मला निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे जाऊ दिले असते त्यांनी माझ्या अर्जावर निर्णय घेतला असता. पोलिसांनी मला बाहेर काढले, पोलिसांनी अरेरावी केली, असा आरोप नलावडे यांनी केला आहे. नलावडे हे पुण्यातील नुमवी शाळेत शिक्षक आहेत, ते शिवाजीनगर मतदारसंघातून निवडणूक लढणार होते.

आंबेडकर राईट्स पार्टी ऑफ इंडियाचे राजन कांबळे यांना गाडी लावायला लवकर पार्किंग न मिळाल्याने उशीर झाला माघार घ्यावी लागली. राजन कांबळे खासगी नोकरी करतात.

निवडणूक वेळापत्रक
4 ऑक्टोबर : उमेदवारी अर्जासाठी अंतिम मुदत
5 ऑक्टोबर : उमेदवारी अर्जांची छाननी
7 ऑक्टोबर : अर्ज मागे घेण्याची मुदत
21 ऑक्टोबर : मतदान
24 ऑक्टोबर : मतमोजणी