अरे बाप रे ! धावत्या बसमध्ये घुसला 80 फुट लांबीचा गॅस पाईप, अन् प्रवाशाचं…

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   चार पदरी रस्त्याच्या बाजूने गॅसची पाईपलाइन टाकण्याचं काम सुरु होतं. त्याचवेळी एक ८० फुटांचा लांब पाईप दुसऱ्या ठिकाणी हलवण्याचं काम सुरु होतं. हायड्रॉलिक मशीनच्या ऑप्रेटरकडून झालेल्या चुकीमुळे हा ८० फुटांचा गॅस पाईप थेट रस्त्यावरुन जाणाऱ्या बसच्या आरपार गेला. या अपघातामध्ये एका प्रवाशाचे डोकं आणि धड वेगळं झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. अन्य एका प्रवाशाच्या डोक्यालाही गंभीर दुखापत झाल्याने त्याचाही मृत्यू झाला. या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात सांडेरावपासून तीन किमी अंतरावर पालीच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर झाला. या मार्गावरील चार पदरी हायवेच्या कडेला गॅस पाईपलाइन टाकण्याचं काम सुरु आहे. मंगळवारी संध्याकाळी चारच्या सुमारास मारवाड जंक्शनवरुन पुण्याच्या दिशेने एका खासगी प्रवाशी बस जात होती. त्याचवेळी हायड्रॉलिक मशीनच्या मदतीने गॅसचे ८० फुटांचे पाईप हलवणाऱ्या मशीन ऑप्रेटरने गॅसचा पाईप थेट हायवेवर आणला. रस्त्यावरुन जाणाऱ्या गाड्यांचा अंदाज न आल्याने आणि मशीनवरील नियंत्रण सुटल्याने हायड्रॉलिक मशीनच्या क्रेनला लटकणारा पाईप थेट खासगी बसच्या खिडकीच्या काचा फोडून दुसऱ्या बाजूने बाहेर आला. बसच्या खिडक्यांमधून मोठ्या आकाराचा पाईप आत आल्याने बसमधील प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आणि एकच गोंधळ उडाला. बसमधून प्रवाशांच्या किंकाळण्याचा आवाज ऐकू येत होता. बसमधील भंवरलाल प्रजापत आणि मैना देवी देवासी यांचा जागीच मृत्यू झाला. हे दोघेही ईसाली गावाचे रहिवाशी होते. या दोघांव्यतिरिक्त १२ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.

या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर सांडेराव पोलीस स्थानकातील अधिकारी धोलाराम परिहार यांच्यासहीत पोलिसांची एक तुकडी घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी जखमींना जवळच्या आरोग्य केंद्रावर पोहचवलं. या अपघातानंतर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली होती.

राजस्थानमधील पाली जिल्ह्यातील सांडेराव पोलीस स्थानकाच्या हद्दीत मंगळवारी ही धक्कादायक दुर्घटना घडली. या दुर्घटनेमध्ये एका महिलेसहीत दोन जणांचा दूर्देवी मृत्यू झाला. या अपघातात १२ जण गंभीर जखमी झाले आहेत. बसमधून आरपार गेलेल्या गॅस पाईपचे फोटो पाहूनच हा अपघात किती भीषण होता याचा अंदाज येतो.

You might also like