Coronavirus : सावधान ! राजस्थानमध्ये कोरोनाच्या तिसर्‍या लाटेची चाहूल, दौसामध्ये 341 मुले आढळली पॉझिटिव्ह

जयपुर : कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा कहर अजूनही थांबलेला नसताना तिसर्‍या लाटेची चाहूल लागल्याने खळबळ उडाली आहे. राजस्थानच्या दौसामध्ये कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचे संकेत दिसून आले आहेत. दौसामध्ये 341 मुलांना कोरोनाची बाधा झाली आहे. तिसर्‍या लाटेची शक्यता गृहीत धरून दौसा जिल्हा प्रशासन अलर्ट झाले आहे.

दौसामध्ये तिसरी लाट येण्याचे संकेत मिळाले आहेत. येथे 341 मुले कोरोना संक्रमित झाली असून यामध्ये 0 ते 18 वर्ष वयोगटातील मुले आहेत. दौसामध्ये 1 मे ते 21 मे च्या दरम्यान 341 मुले कोरोना संक्रमित आढळली आहेत. जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले की, 341 मुले संक्रमित आहेत, परंतु यापैकी कुणीही सीरियस नाही. सध्या, कोविडच्या तिसर्‍या लाटेची शक्यता पहाता जिल्हा रूग्णालयास अलर्ट करण्यात आले आहे.

घर-घर सर्वे अभियान
राजस्थानच्या ग्रामीण भागात कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी राज्य सरकार युद्धपातळीवर तयारी करत आहे. आरोग्य विभागाची पथके गावागावात आणि दारोदारी जाऊन लोकांची कोविड टेस्ट करणार आहेत. गावात कोविड सेंटर बनवले जाईल आणि पॉझिटिव्ह आढळलेल्या रूग्णांवर उपचार सुरू केला जाईल. घर-घर सर्वे अभियान सुरू करण्यात आले आहे.

तिसरी लाट येण्यापूर्वीच मुलांमध्ये कोरोनाची प्रकरणे वेगाने वाढत आहेत. उत्तर प्रदेश, बिहार, गुजरात, कर्नाटकसारख्या राज्यांमध्ये संसर्ग वेगाने पसरत आहे. तज्ज्ञांचा अंदाज आहे की, मुलांसाठी तिसरी लाट धोकादायक ठरू शकते. तिसर्‍या लाटेत मुले सर्वात जास्त कोरोना पॉझिटिव्ह होण्याची शंका व्यक्त करण्यात आली आहे. अशावेळी आता दौसात 341 मुले कोरोना बाधित सापडल्याने अडचणी वाढताना दिसत आहेत.

एका आकड्यानुसार, कोरोनाच्या पहिल्या लाटेत 9 मार्च ते 25 सप्टेंबर 2020 च्या दरम्यान 10 वर्षांच्या छोट्या मुलांच्या 19,378 केस आणि 11 ते 20 वर्षांच्या मुलांची 41,985 प्रकरणे समोर आली होती. तर, कोरोनाची दुसरी लाट हे सर्व विक्रम मोडताना दिसत आहे. अवघ्या 15 दिवसात म्हणजे 1 ते 16 मे 2021 च्या दरम्यान 19 हजार मुलांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

हेल्थ एक्सपर्टनुसार, बहुतांश मुले जी कोविडने प्रभावित आहेत, त्यांच्यात हलका ताप, खोकला, सर्दी, श्वास घेण्यास त्रास, अतिसार, चव आणि वासाची क्षमता जाणे, थकवा, घशात खवखव, मांसपेशी दुखणे आणि नाक वाहणे ही लक्षणे दिसून येत आहेत.