शेजारी राहणाऱ्या प्रियकराच्या मदतीने पत्नीने पतीची घडवून आणली हत्या, पत्नीसह चौघांना अटक

अलवर : पोलीसनामा ऑनलाइन –   राजस्थानमधील अलवर येथील एका हत्याकांडाचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले आहे. शेजारी राहणाऱ्या प्रियकराच्या मदतीने पत्नीनेच पतीची हत्या घडवून आणल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. जखराना गावाजवळ या हत्येचा उलगडा करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी पत्नीसह चौघांना अटक केली आहे.

बाबू कृष्णकुमार असे हत्या झालेल्या पतीचे नाव आहे. या प्रकरणी त्याची पत्नी कुसुमलता हिच्यासह चौघांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत बाबू महेंद्रगढ भुंगारका येथून दुचाकीवरून दररोज बहरोडमधील जखराना येथे ड्युटीवर जात असे. तो नोकरीसाठी घराबाहेर पडल्यानंतर त्याचा शेजारी सन्नी त्याच्या घरी येत असे. त्याचवेळी बाबूच्या पत्नीचे त्याच्यासोबत प्रेमसंबंध जुळले. याबाबत बाबूला समजले. त्यामुळे तो सन्नीवर चिडून होता. त्यानंतर पत्नी आणि सन्नीने त्याच्या हत्येचा कट आखला. या कटात त्यांनी गावातीलच अशोक कुमार यालाही सामील करून घेतले. त्यानंतर कुसुमलता हिने 4 लाख रुपये सन्नीला आणून दिले. सन्नीने याच पैशांतून गावातीलच एका व्यक्तीकडून कार खरेदी करून ती अशोकच्या नावे केली. कार घेतल्यानंतर अशोकने बाबूचा अनेकवेळा पाठलाग केला. मात्र, त्याला धडक देऊन त्याची हत्या करण्यात अपयशी ठरला होता. 1 एप्रिल रोजी सकाळी साडेसात वाजता तो आपल्या गावातून दुचाकीवरून जखरानाकडे निघाला. त्याची माहिती कुसुमलता हिने सन्नीला दिली. सन्नीने अशोकला सांगितले. त्याने दुचाकीला जोरदार धडक दिली. खाली पडल्यानंतर त्याच्या अंगावरून कार नेली. यामुळे बाबू कृष्णकुमार याचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी पत्नीसह चौघांना गजाआड केले आहे.