करणला ‘कॉफी’ पडली महागात, ‘त्या’ तिघांवरही गुन्हा दाखल 

मुंबई : वृत्तसंस्था – काही दिवसापूर्वी कॉफी विथ करण या चॅट शोमध्ये क्रिकेटर हार्दिक पांड्या आणि के एल राहुलने हजेरी लावली होती. या कार्यक्रमात पांड्याने महिलांविषयी खळबळ जनक विधान केलं होत. या नंतर हार्दिकवर नेटिझन्सने सडकून टीका केली होती. पांड्याचे ते विधान महिलांचा अनादर करणारे असल्यामुळे अनेकांनी पांड्याला चांगलेच सुनावले होते. त्या विधानामुळे बीसीसीआयने या दोघांवर कारवाई केली होती.
आता या वक्तव्यामुळे हार्दिक पांड्या आणि के एल राहुल यांच्यासह निर्माता करण जोहर यांच्या समोरील अडचणीत वाढ निर्माण झाली आहे. या तिघांच्या विरोधात राजस्थानमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जोधपूरमधील सरेचा गावात राहणारे देवाराम मेघवाल यांनी महिलांसंदर्भात अश्लील विधान करणे, आयटी अॅक्ट या कलमांतर्गत लूनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मेघवाल यांनी पोस्टाद्वारे पोलिसांकडे तक्रार अर्ज पाठवला होता. पोलिसांनी गुन्हा दाखल करत आता तपासाला सुरुवात केली आहे.
लोकेश राहुल आणि हार्दिक पंड्या हे दोघे ‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमात गेले होते त्या वेळी करणने हार्दिकला खाजगी आयुष्याविषयी प्रश्न विचारले होते. या प्रश्नांचे उत्तर देताना हार्दिकने महिलांविषयी खळबळ जनक वक्तव्य केले होते. यामुळे हार्दिकवर अनेक लोकांनी टीका केल्या होत्या. एवढेच नाही तर क्रिकेटजगतातून ही अनेकांनी या दोघांवर टीका केल्या होत्या.