Online संवाद साधताना मुख्यमंत्री ‘लॉकडाऊन’ शब्द विसरले, देशभरात झाले ट्रोल; व्हिडीओ व्हायरल (Video)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. देशात दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत विक्रमी वाढ होत आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोना व्हायरसची साखळी तोडण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहे. राज्यांचे मुख्यमंत्री ऑनलाईन जनतेशी संवाद साधत आहे. आपल्या संवादामध्ये ते जनतेला कोरोनाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन करत आहेत. राजस्थानमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी नागरिकांना सरकारी नियमांचे पालन करण्याचे आवाहन करत आहे. मात्र, ऑनलाइन संवाद साधत असताना त्यांची एक चूक झाली अन् देशभरातील नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली. अशोक गेहलोत हे ऑनलाईन संवादादरम्यान लॉकडाऊन हा शब्द विसरले. त्यांना लॉकडाऊन शब्द आठवत नसल्याने अखेर त्यांनी डोक्याला हात लावला. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

नेमकं काय घडलं ?

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे व्हिडीओच्या माध्यमातून काँग्रेसच्या मजूर संघटना इंटकच्या स्थापना दिवसानिमित्त ऑनलाइन संवाद साधत होते. यावेळी त्यांनी राज्यात पसरत असलेल्या कोरोना व्हायरससंबंधी भाष्य केले. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की सध्या 3 ते 17 मे या कालावधीत ‘जनअनुशासन पखवाडा’ सुरु आहे. त्यामुळे लॉकडाऊन सारखे नियम लागू करण्यात आले आहेत. लॉकडाऊन प्रमाणेच हे नियम पाळावेत असे आवाहन ते जनतेला करत होते. मात्र, यावेळी त्यांना लॉकडाऊन हा शब्द आठवला नाही. त्यामुळे पुढे काय बोलावे हेच त्यांना सुचेना. खूप प्रयत्न करुन देखील शब्द आठवत नसल्याने त्यांनी डोक्याला हात लावला.

नेटकऱ्यांकडून ट्रोल

गेहलोत हे लॉकडाऊन हा शब्द विसरल्यामुळे हा व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. मुख्यमंत्र्यांनाच लॉकाडाऊन शब्द आठवत नसल्याने नेटकऱ्यांनी अशोक गेहलोत यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली. सोशल मीडियावर गेहलोत यांचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. अखेर एका चिठ्ठीवर लिहून दिल्यानंतर त्यांनी लॉकडाऊन हा शब्द स्पष्टपणे उच्चारला.