काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी ‘चव्हाट्यावर’ ; ‘यांना’ मुख्यमंत्री करण्याची मागणी

जयपूर : राजस्थान – लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी समोर येऊ लागली आहे. लोकसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी स्वीकारावी तसेच त्यांना मुख्यमंत्री पदावरून हटवून राजस्थान प्रदेश काँग्रेसचे प्रमुख व उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांना मुख्यमंत्री करावे अशी मागणी पृथ्वीराज मीना या आमदाराने केली आहे. पृथ्वीराज मीना हे टोडाभीम मतदारसंघातून आमदार आहेत.

काँग्रेसच्या पराभवाविषयी बोलताना पृथ्वीराज मीना म्हणाले की, ‘जेव्हा पक्ष सत्तेत असतो तेव्हा पराभवाची जबाबदारी मुख्यमंत्र्यांची असते आणि जर पक्ष विरोधी पार्टीत असेल तर पराभवाची जबाबदारी पक्षाच्या अध्यक्षाची असते. म्हणून सचिन पायलट यांना मुख्यमंत्री बनवले पाहिजे. ‘तसेच हे माझे वैयक्तिक मत आहे असेही पृथ्वीराज मीना म्हणाले. दरम्यान पायलट यांनी विधानसभा निवडणुकीत यश मिळवून दिले होते म्हणून पायलट यांना मुख्यमंत्री बनवा अशी मागणी मीना यांनी यापूर्वीही केली होती.

मुलाच्या पराभवासाठी अशोक गेहलोत यांनी सचिन पायलटना धरले जबाबदार
मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी एका मुलाखतीत उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांना जबाबदार धरले आहे. वैभव गेहलोतच्या पराभवाची जबाबदारी सचिन पायलट यांनी स्वीकारावी असे अशोक गेहलोत यांनी म्हटले होते. कारण निवडणुकीपूर्वी पायलट यांनी विजयाचा दावा केला होता. गहलोत आणि पायलट यांच्या समर्थकांकडून वेगवेगळी विधाने केली जात आहेत.

राजस्थानात काँग्रेसची सत्ता असूनही लोकसभेच्या सर्वच्या सर्व २५ जागांवर काँग्रेसचा पराभव झाला. निवडणुकीच्या चार ते पाच महिने आधी झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने भाजपचा पराभव करुन सत्ता मिळवली होती.

पक्षहितापेक्षा कुटुंबाला अधिक महत्त्व : राहुल गांधी

लोकसभा निवडणुकीतील पराभावाची समीक्षा करण्यासाठी काँग्रेसच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत राहुल गांधी यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ आणि पी. चिदंबरम यांच्यावर नाराजी व्यक्त केली होती. या नेत्यांनी पक्षहितापेक्षा स्वत:च्या मुलांना अधिक महत्त्व दिले. तसेच काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर पक्षाच्या नेत्यांनी म्हणावे तसे गांभीर्य दाखवले नाही असे राहुल गांधी म्हणाले होते.

Loading...
You might also like